साखरेऐवजी गुळ खाऊन वजन नियंत्रणात ठेवता येतं का?

वजन कमी करणाऱ्यांसाठी गुळ हा साखरेला पर्याय असून शकत नाही असं आहारतज्ज्ञ अमिता गद्रेंचं म्हणणं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सध्या सर्वच जणं आहाराबाबत जागृत झाल्याचं पाहायला मिळतं. अगदी खाण्या-पिण्याच्या बाबतील आपण अधिक सजग झालो आहोत. अनेक ठिकाणी साखरेच्या पदार्थांऐवजी गुळाचा वापर केला जातो. वजन नियंत्रण आणण्यासाठी साखरेला पर्याय म्हणून गुळाकडे पाहिलं जातं. मात्र प्रत्यक्षात वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी गुळ हा पर्याय आहे का? आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी साखर आणि गुळाबाबत दिलेली माहिती अनेकांसाठी धक्कादायक आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी गुळ हा साखरेला पर्याय असून शकत नाही असं अमिता गद्रेंचं म्हणणं आहे. 

साखरेने वजन वाढतं म्हणून लोक गुळाकडे धाव घेतात. गुळावर कमी प्रक्रिया केलेली असली तरी साखर आणि गुळाच्या कॅलरीजमध्ये फरक दिसून येत नाही. दोन्हीमधून कॅलरिज आणि पोषक द्रव्यं सारखीच मिळत असतात. साखरेचा चहा नको म्हणून ठिकठिकाणी गुळाच्या चहाची दुकानं थाटली जातात. अनेक मधुमेहीदेखील गैरसमजातून गुळाचं सेवन करतात. गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. परंतु गुळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने किंवा पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेतल्यास धोकादायक ठरू शकते.

लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे साखरेमध्ये जितक्या कॅलरीज असतात तितक्याच गुळामध्येही असतात. मधुमेहाचे रुग्ण साखरेऐवजी सर्रास गुळाचं सेवन करतात. मात्र गुळात सुक्रोज असतात. जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतात. 

ब्राउन शुगर आणि व्हाइट म्हणजे नेहमीची साखर यांच्यामधली कॅलरीजची घनता जवळपास सारखीच असते. ब्राउन शुगरमध्ये प्रति 100 ग्रॅममागे 375 कॅलरीज असतात, तर व्हाइट शुगरमध्ये प्रति 100 ग्रॅम 390 कॅलरीज असतात. मधात 100 ग्रॅममागे 240 ते 330 कॅलरीज असतात. गुळात 100 ग्रॅममागे 380 कॅलरीज असतात.

Advertisement

साखर कमी का खावी?
साखरेमध्ये एम्प्टी कॅलरीज असतात. ज्यातून इतर कुठल्याही प्रकारचं पोषण मिळत नाही. एम्प्टी कॅलरीज वाढल्याने एकूण कॅलरीजही वाढतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी साखरेला पर्याय शोधण्याऐवजी साखर खाणं बंद करणं फायद्याचं ठरू शकेल. आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी सांगितलं, बऱ्याच कंपन्या 'लो कॅलरीज' किंवा 'लो फॅट्स'च्या नावाखाली गैरसमज पसरवत असतात. अशावेळी पॅकेटवरील न्यूटियंट लेबल वाचणं फायद्याचं ठरू शकतं. बऱ्याचदा लो शुगर पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. पदार्थांमधील चव वाढविण्याच्या दृष्टीने कंपन्यांकडून अशा क्लृप्त्या लढवल्या जातात. अनेक कमी साखरेच्या चॉकलेट्समध्ये फॅट्स जास्त असल्याचं त्यावरील लेबल वाचल्यावर लक्षात येतं. 

Topics mentioned in this article