DMart News: प्रसिद्ध सुपरमार्केट साखळी असलेल्या 'डी-मार्ट'मधील सॉफ्टी आईस्क्रीममध्ये चक्क जिवंत किडा आढळल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. दररोज हजारो नागरिक विश्वासाने खाद्यपदार्थ खरेदी करत असलेल्या डी-मार्टसारख्या मोठ्या ब्रँडमध्येच असा निष्काळजीपणा समोर आल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त तक्रारदाराने तुकाराम मुंढे यांच्या अखत्यारीतील अन्न आणि औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली असून, दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
हा सर्व प्रकार नागपूरमधील बहादुरा येथील डी-मार्ट आउटलेटमध्ये घडला आहे. येथे खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाने सॉफ्टी आईस्क्रीम घेतली असता, त्यात जिवंत किडा दिसून आला. लहान मुले अत्यंत आवडीने ही सॉफ्टी खातात, त्यामुळे असा प्रकार त्यांच्या जिवाशी खेळणारा आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून अन्न व औषध प्रशासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नागपूरच्या बहादुरा येथील डी-मार्टमधील सॉफ्टी मशीन आणि विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व खाद्यपदार्थांची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार डी-मार्ट व्यवस्थापनावर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी तक्रारदाराने तुकाराम मुंढे यांच्या प्रशासनाकडे केली आहे. भविष्यात कोणत्याही आउटलेटमध्ये असा प्रकार घडू नये, यासाठी शहरातील सर्वच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : DMart News: झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी )
मनसेचा आक्रमक इशारा अन् आंदोलनाची तयारी
या गंभीर घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या विषयात थेट हस्तक्षेप केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या डी-मार्ट आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर मनसे संपूर्ण नागपुरात तीव्र जनआंदोलन उभारेल, असा थेट इशारा मनसे शहराध्यक्ष विशाल बडगे यांनी दिला आहे. संपूर्ण शहरातील रिटेल स्टोअर्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची एफडीएने विशेष मोहीम राबवून तपासणी करावी, अशी आग्रही मागणीही मनसेतर्फे करण्यात आली आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देताना मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीए प्रशासन या प्रकरणावर काय कारवाई करते, याकडे सर्व नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world