
Mango Side Effects : आंबा हा फळांचा राजा आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. आंब्याची चव इतकी भन्नाट असते की त्याची सर इतर कुठल्याही फळाला येऊ शकत नाही. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आंब्याचा प्रत्येकजण चाहता असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यासारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास, दृष्टी सुधारण्यास आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय आंब्यातील फायबर, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटी-ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करण्यास, चयापचय क्रिया सुधारण्यास आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. मात्र आंब्यासोबत काही विशिष्ट कटाक्षाने खाणे टाळले पाहीजे. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया...
नक्की वाचा : ताकात काळे मीठ मिक्स करुन रोज प्यायले तर काय होईल? हा फायदा कोणालाच नाही माहीत
कारले
आयुर्वेदानुसार आंबा आणि कारले एकत्र खाणे टाळावे. आंबा हा उष्ण असतो आणि कारले हे थंड असते. परस्परविरोधी गुणधर्म असल्याने आंबा आणि कारले एकापाठोपाठ खाल्ले तर त्यामुळे मळमळ, उलटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.
दही
काहीजण आंबा आणि दही एकत्र करून मँगो लस्सी बनवतात. मात्र आंबा आणि दही एकत्र करून खाणे हे योग्य नाही. यामुळे पोटदुखी किंवा अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
मसालेदार खाद्यपदार्थ
दुपारच्या जेवणात तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील, तर लगेच आंबा खाऊ नका. यामुळे पोटदुखी, जळजळ आणि अपचनाची समस्या होऊ शकते.
कोल्ड ड्रिंक
आंबा खाल्ल्यानंतर तत्काळ कोल्ड ड्रिंक पिणे प्रकृतीसाठी चांगले नाही. दोन्हीमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण एका झटक्यात वाढू शकते. आंबा उष्ण असतो आणि कोल्ड ड्रिंक किंवा सोडा हा कार्बोनेटेट असतो. दोन्ही एकत्र झाल्यास पोटदुखी, पोट फुगणे, अपचनासारखा त्रास होऊ शकतो.
नक्की वाचा : कानातील मळ काढण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय, चुंबकाप्रमाणे बाहेर येईल घाण
पाणी
आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिणे हे देखील प्रकृतीसाठी अपायकारक आहे. यामुळे जुलाब होऊ शकतात. त्यामुळे आंबा खाल्ल्याच्या किमान 30 मिनिटे पाणी पिऊ नये.
आंबा कधी खावा?
आंबा हा शक्यतो रात्री खाऊ नये. आंबा सकाळी किंवा दुपारी खावा. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणापूर्वी आंबा खाणे हे प्रकृतीसाठी अपायकारक ठरत नाही, असं केल्यास आंबा सहजरित्या पचणे शक्य होते. अॅसिडिटीचा त्रास असल्यास रिकाम्या पोटी आंबा खाणे टाळावे. आंब्यामध्ये साखर आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते. रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि चयापचय क्रिया बिघडू शकते.
आंबा कसा खावा?
आंबा पूर्णपणे पिकलेला असावा आणि तो स्वच्छ धुवून खावा. आंबा थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवून मग खाल्ल्यास चांगला असतो, मात्र एकदम थंडगार आंबा खाऊ नये कारण त्यामुळे घशात खवखव होऊ शकते. आंबा किमान अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर त्यातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे शरीराला अपाय होत नाही. आंबा अतिप्रमाणात खाऊ नये, तसे केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
(अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या माहितीची जबाबदारी एनडीटीव्ही घेत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world