जाहिरात

Eurasian Coot : युरेशियन कूट नावाच्या पक्षाला 'वारकरी' का म्हणतात? नावामागील रंजक कहाणी...

युरेशियन कूट किंवा वारकरी, मोठ्या संख्येने हिवाळ्यात पूर्व युरोप तसेच भारताच्या उत्तरेकडील भागांमधून दक्षिणेला येतात.

Eurasian Coot : युरेशियन कूट नावाच्या पक्षाला 'वारकरी' का म्हणतात? नावामागील रंजक कहाणी...

ओवी थोरात

उत्तरेकडे थंडी वाढली की हिवाळ्यात भारतात अनेक स्थलांतर करणारे पक्षी येतात. अशा पक्ष्यांपैकी एक अतिशय सामान्य आणि सहज ओळखता येणारा पक्षी आहे युरेशियन कूट. ह्याला मराठीत वारकरी असं नाव ठेवण्यात आलं आहे. असं नाव ठेवण्याचं कारण तो पक्षी पाहताच लक्षात येतं. मुख्यतः काळ्या रंगाच्या ह्या पक्ष्याचा कपाळावर किंवा डोक्याच्या पुढच्या बाजूला पांढर्‍या रंगाचा मोठा ठिपका असतो, अगदी पांढरी टोपी लावल्यासारखा. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंग्रजीत पक्ष्यांची, फुलपाखरांची, आणि प्राण्यांची नावे माणसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याची जोडण्याची पद्धत आहेच. आपल्या वासाहतिक ब्रिटिश इतिहासाच हा एक भाग आहे. त्याचप्रमाणे मराठीतही ही पद्धत आली असावी. बर्‍याचदा अशी नावे साचेबंद होतात. उदाहरणार्थ, ब्राह्मणी काईट किंवा घार जिचे डोके आणि गळा पांढर्‍या रंगाचा असतो आणि शरीर लालसर तपकिरी रंगांचं असतं. किंवा काळ्या रंगांचे, आकाराने मोठे असे मॉरमॉन फुलपाखरू ज्याच्या मादी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. (अमेरीकेत मॉरमॉन नावाचा एक समाज आहे ज्यांच्यात एका पुरुषाने एकापेक्षा जास्त बायकांशी लग्न केलेले मान्य असते). 

Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ

नक्की वाचा - Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ

युरेशियन ह्या शब्दालाही एक भौगोलिक राजकीय इतिहास आहे. आशिया आणि पूर्व युरोप म्हणजेच कझाकीस्तान, रशिया इत्यादी यांना एकत्रितपणे संबोधण्यास ह्या शब्दाचा वापर होतो. भारतही त्याचा भाग आहे. ह्या भागातील पर्यावरण सुद्धा अनेकरित्या एकमेकांशी जोडलेली आहे. ह्या भूभागात सहज आढळणार्‍या प्राणी आणि पक्ष्यांची इंग्रजीतील सामान्य नावे त्यामुळे ह्या शब्दाने सुरू होतात. कूट हा शब्द इंग्रजीत विक्षिप्त माणसासाठीही वापरला जातो. त्याचा आणि ह्या सुरेख पक्ष्याचा काय संबंध ते मात्र पाहायला हवे.

युरेशियन कूट पक्षांची काही वैशिष्ट्ये...
तर युरेशियन कूट किंवा वारकरी, मोठ्या संख्येने हिवाळ्यात पूर्व युरोप तसेच भारताच्या उत्तरेकडील भागांमधून दक्षिणेला येतात. हिवाळ्यात हिमालय आणि त्याच्या उत्तरेकडील भागात तापमान खूप खाली जाते, काही ठिकाणी पाणी थिजते, तसेच पुरेसे खाद्य नसते. त्यामुळे हे स्थलांतर करतात. एका प्रकारे नियमित वारीवर जातात. काही युरेशियन कूट मात्र वर्षभर भारतातच राहतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे तलावांमध्ये वर्षभर पाणी आणि वनस्पती उपलब्ध असतात अशा ठिकाणी ते सर्व ऋतूंमध्ये दिसतात. दुरून एखाद्या बदकाप्रमाणेच दिसणारा हा पक्षी पाणकोंबड्यांचा जास्त जवळचा नातलग. जमिनीवर चालत असताना ते अगदी कोंबडी सारखेच वाटतात. बर्‍याचदा बदकांसह ते मोठ्या गटात तलावांमध्ये किंवा इतर पाणथळ जागी पोहताना आढळतात. त्यांचे पाय पोहताना पाण्याखाली असल्यामुळे नीट दिसत नाहीत, पण ते जमिनीवर, तलावाच्या काठी आले तर हे लक्षात येते की त्यांचे पाय बदकांपेक्षा थोडे वेगळे आहेत.

ह्या पक्ष्यांना निळसर रंगांची लांबलचक आणि जाड पण सपाट बोटे असतात. शरीराच्या मानाने त्यांचे पाय त्यामुळे खूपच मोठे वाटतात. आपल्या आगळ्यावेगळ्या पायांचा वापर करून ही पक्षी पोहतातच, पण त्या पायांचा पाण्याचा रन वे सारखा वापर करून आकाशात झेप घेण्यासाठीही उपयोग होतो. ह्या बोटांचा वापर करून त्यांना त्यांचे खाद्य शोधता येते, पाण्यावरील वनस्पतींमधून सहज चालता येते. तलावांच्या आजुबाजूला आणि पाण्यात राहणारे कीटक, पाणवनस्पतींचे कोवळे कोंब, उभयचर प्राणी, आणि इतर मृदू शरीराचे छोट्या आकारांचे प्राणी हे त्यांचे आवडते खाद्य आहे. पोहणे, खाद्य शोधणे आणि अधूनमधून आपल्या ओल्या पिसांना नीट साफसूफ आणि सरळ करणे असा त्यांचा बहुतांश दिनक्रम असतो. पाण्यात वावरताना तसेच विसाव्यासाठी काठावर आल्यावर अनेकदा ते विविध प्रकारचे आवाज करतात. कधीकधी सतत बडबड करत असल्यासारखा चिवचिवाट करतात. कधीकधी रात्रीच्या वेळीही कर्कश्य आवाज करतात. 

Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स

नक्की वाचा - Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स

महाराष्ट्रात यांना अनेक ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भिगवण तलावातही हे मोठ्या संख्येने दिसतात. तरीही, दरवर्षी अनेक ठिकाणी होणार्‍या पक्षीमित्रांच्या नोंदींनुसार वारकरी पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. काही ठिकाणी ह्यांची शिकार होते. पण बहुदा इतर कारणे, विशेषतः प्रदूषण, बदलणारे हवामान, दिवसेंदिवस वाढत जाणारा सरोवरांचा आणि तलावांचा होणारा र्‍हास त्यांच्या घटणार्‍या संख्येच्या मागे असावीत. पुढच्या वेळी तुम्हाला हे पक्षी विश्वातील वारकरी दिसले तर त्यांचे नक्की निरीक्षण करा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com