सध्या घराघरांमध्ये गणेश चतुर्थीची लगबग सुरू आहे. येत्या काही तासात गणपती घरोघरी विराजमान होतील. यापूर्वी स्वयंपाकघरात बाप्पासाठी सुग्रास पदार्थांची मेजवाणीची तयारी केली जात आहे. त्यात सर्वात आधी नंबर लागतो तो मोदकाचा. पांढरे शुभ्र, सुंदर अन् नाजूक कळ्या असलेले... चविष्ठ मोदक हा गणपती बाप्पाबरोबरच सर्वसामान्यांचा वीक पॉइंट आहे. गणपतीला 11 तर कधी 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र (Ganesha's favorite Modak) मोदकच का? गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देण्यामागील काय आहे कारण? खगोलतज्ज्ञ, पंचागकर्ते यांनी यामागील कारण सांगितलं.
प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवला नाही तर अर्पण केला जातो. दाखवणे हा शब्दप्रयोग योग्य नाही. मोदक याचा अर्थ पाहिला तर मोद म्हणजे आनंद. आनंद देणारं ते मोदकं.. असा याचा अर्थ आहे.
(नक्की वाचा :Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)
आणखी एका प्रचलित कथेनुसार, भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांच्याशी झालेल्या युद्धात गणेशाचा एक दात तुटला होता. त्यामुळे बाप्पाला जेवताना खूप त्रास व्हायचा. यावेळी त्याच्यासाठी स्वादिष्ट लाडू आणि मोदक बनवले जायचे.जे खायला बाप्पाला त्रास होत नव्हता. मोदक हे गरीबांपासून श्रीमंतांकडे सर्वांना करता येतात. मोदकाला तांदुळाचं पीठ, गूळ, नारळ या साहित्यांची गरज असते. सर्वांकडे हे पदार्थ उपलब्ध असतात.
21 मोदकांचा नैवेद्य का?
गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामागेही कारण आहे. आपल्याकडे 21 मातृदेवता आहेत. गणेश हा मातृभक्त आहे. त्यामुळे गणेशाला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवाला गूळ आणि खोबरं देण्याची प्रथा खूप आधीपासून सुरू आहे. देवपूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाचं विशेष महत्त्व आहे. मोदकात नारळ आणि गुळाचं सारण असतं. देशभरात मोदकाशी जवळपास जाणारे पदार्थ तयार केले जातात आणि त्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्या त्या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ओला आणि सुका नारळ वापरला जातो.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world