Super El Nino 2026 : गेल्या काही महिन्यांपूर्वी पॅसिफिक महासागरात ज्या थंड प्रवाहांचे साम्राज्य होते, तिथे आता असा काही बदल झाला आहे ज्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नोआ या संस्थेने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, पॅसिफिक महासागरात शक्तिशाली एल निनो प्रवाह सक्रिय झाला आहे. हा प्रवाह येत्या हिवाळ्यात म्हणजेच 2026-27 दरम्यान अधिक तीव्र होणार असून, हा गेल्या 150 वर्षांतील सर्वात भयानक एल निनो ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रवाह अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचण्याची शक्यता तब्बल 63 टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे.
एकाच वर्षात हवामानाचे चक्र पूर्णपणे उलटले
या वर्षाच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागरात ला निनोची परिस्थिती होती, जी हवामान थंड ठेवण्यास मदत करते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच ला निनो संपून तिथे अत्यंत वेगवान पद्धतीने एल निनो तयार झाला आहे. एकाच वर्षात हवामानामध्ये एवढा मोठा आणि वेगवान बदल होणे ही अत्यंत दुर्मिळ आणि चिंताजनक गोष्ट मानली जाते. यामुळे अनेक खंडांमधील हवामान चक्र पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
समुद्रातील उष्णतेच्या लाटांनी वाढवले संकट
चिंतेत भर घालणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, 2025 च्या उत्तरार्धापासून उत्तर पॅसिफिक महासागराच्या भागात समुद्रातील उष्णतेच्या लाटा म्हणजेच मरीन हीटवेव्ह तयार झाल्या आहेत. समुद्राचे पाणी अनपेक्षितपणे कमालीचे तापले असून, यामुळे एल निनोचा प्रवाह अधिक शक्तिशाली होत आहे का, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत. या दोन्ही घडामोडी एकाच वेळी घडत असल्यामुळे सागरी जीवसृष्टी आणि मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Rental boyfriend : भारतात तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड मिळायला सुरुवात, रेट कार्ड आणि अटी वाचल्या का? )
गॉडझिला एल निनोचा नवा विक्रम मोडीत निघणार
हवामान शास्त्रज्ञ झेके हॉसफादर यांच्या विश्लेषणानुसार, 2026 चा हा एल निनो यापूर्वीचे 1997-98 आणि 2015-16 मधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकतो. याला वैज्ञानिक भाषेत किंवा माध्यमांमध्ये गॉडझिला एल निनो किंवा सुपर एल निनो असेही म्हटले जाते.
पॅसिफिक महासागराच्या केंद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 1877 पासूनच्या सर्वात मोठ्या 5 एल निनो घटनांमध्ये केवळ 0.5 अंश सेल्सिअसचा फरक होता, मात्र 2026 चा हा एकच प्रसंग जुना रेकॉर्ड तब्बल 0.8 अंश सेल्सिअसने मागे टाकेल असा अंदाज आहे.
( नक्की वाचा : Lionel Messi: सेमीफायनलच्या लढतीपूर्वी मेस्सी पिणार 'तो' खास चहा? वाचा काय आहे ते सिक्रेट कनेक्शन )
ग्लोबल वॉर्मिंगमुळे आगीत तेल पडणार
ब्रिटनच्या हवामान विभागाने देखील स्पष्ट केले आहे की, हा एल निनो गेल्या काही दशकांतील सर्वात विनाशकारी प्रवाहांच्या बरोबरीचा असेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजेच पृथ्वीचे तापमान आधीच वाढलेले असल्यामुळे, एल निनोची उष्णता त्यात आणखी भर घालेल. यामुळे जगातील अनेक भागांमध्ये तापमान कधीही न पाहिलेल्या पातळीवर पोहोचू शकते आणि वादळे, पूर यांसारख्या टोकाच्या हवामान आपत्ती ओढवू शकतात.

कुठे पूर तर कुठे भीषण दुष्काळाचा धोका
या महाभयानक एल निनोचे परिणाम जगभर वेगवेगळ्या पद्धतीने दिसतील. पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवरील देशांमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि संपूर्ण आशिया खंडात भीषण दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेच्या दक्षिण राज्यांमध्ये तीव्र वादळे आणि किनारपट्टीवर पूर येण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक एल निनो हा वेगळा असतो, त्यामुळे स्थानिक पातळीवर याचे परिणाम बदलू शकतात.
अस्सल फटका 2027 मध्ये बसणार
एल निनोचा सर्वाधिक प्रभाव तो निर्माण झाल्यानंतर काही महिन्यांनी जाणवतो. याचा अर्थ असा की, या प्रवाहाचा खरा फटका जगाला 2027 मध्ये बसेल. शास्त्रज्ञांच्या मते, 2027 हे वर्ष जगाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. याचा थेट परिणाम शेती, पिण्याचे पाणी, समुद्रातील प्रवाळ आणि मासेमारीवर होणार आहे. असे असले तरी शास्त्रज्ञांनी घाबरून न जाता पूर्वतयारी करण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्व देशांनी आणि प्रशासनाने या धोक्याचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world