सुनील दवंगे, प्रतिनिधी
Guru Purnima 2025: दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदा ही गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला बुधवारी काकड आरतीनं प्रारंभ झाला असून गुरुवारी (10 जुलै) उत्सवाचा मुख्य दिवस आहे. महत्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मुख्यदिनी मशहूर गायिका अनुराधा पौडवाल यांचा साईभजन संध्याचा कार्यक्रम असून साई मंदिर भावीकांना दर्शनासाठी रात्रभर खुले असणार आहे.
साईबाबा संस्थानच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास बुधवारी पहाटे प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती मंगलस्थानानंतर साईबाबांची पोथी, फोटो, विना आणि चरणपादुकाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या उत्सवात तीन लाख भावीकांना तसेच भक्तमंडळ, दानशूर भाविक यांना साईसंस्थानच्या वतीन निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच तीन दिवसात साडे तीन लाख भाविक साई दर्शन घेतील असा अंदाज असून साईसंस्थानच्या वतीनं भावीकांना निवास,भोजन आणि साई दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. त्याच बरोबर पावसाचे दिवस अयल्याने ठिकठिकाणी अतिरिक्त मंडप व्यवस्था उभारण्यात आली आहे.
साई गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात कधी झाली?
साईबाबांचे निस्सिम भक्त तात्यासाहेब नुलकर हे त्यांची आई व सासू यांना घेऊन शिर्डीत आले होते. त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा असल्याने तात्यासाहेब नुलकरांनी पौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा केली. पूजा करुन तात्यासाहेब नुलकर निघून गेल्यानंतर बाबांनी तात्या पाटील कोते यांना बोलावणे पाठवले.
( नक्की वाचा: Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि उपाय )
बाबांचे बोलावणे आले त्यावेळी तात्या पाटील कोते हे आपल्या शेतावर काम करत होते. बाबांचे बोलावणे आल्यानंतर लगेचच ते बाबांकडे आले. त्यावेळी साईबाबा तात्या पाटील कोतेंना म्हणाले, ‘तो काय एकटा माझी पूजा करतो, तुला करायला काय झाले?' भक्तांच्या मनात इच्छा असूनही बाबा रागावतील म्हणून त्यांची गुरु म्हणून पूजा करण्याचे धाडस कोणी दाखवत नसे. परंतु आता बाबांनीच अप्रत्यक्ष संमती दिल्याने तात्या पाटील कोते आणि तेथे उपस्थित असलेले माधवराव देशपांडे वगैरे भक्तांना खूप आनंद झाला.
त्यानंतर दादा केळकर जेष्ठ असल्याने त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी व्दारकामाईत जावून गंध, अक्षदा, हार, फुले, धोतरजोडी घेवून जावून बाबांची यथाविधी पूजा केली. तेंव्हापासून साईभक्त गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करु लागले.
(नक्की वाचा: Happy Guru Purnima 2025 Wishes: गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप! गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता )
उत्सवाचा पहिला दिवस
पहाटे ०५.१५ वाजता साईंची काकड आरती झाल्यानंतर साईबाबांची पोथी, फोटो, विना आणि चरणपादुकाची सवाद्य मिरवणूक साई समाधी मंदिरातून गुरुस्थान मार्गे व्दारकामाईत गेली आणि तिथे अखंड साईचरित्र पारायणास सुरुवात झाली.
या उत्सवाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी साईसमाधीची पाद्यपूजा केली. दिवसभर विविध कार्यक्रम होवून रात्रौ ०९.१५ वा. साईंची पालखीची गावातून मिरवणूक निघाली. तर शेजारती रात्री नेहमीप्रमाणे १०.०० वा शेजारती झाली. तर अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली.
उत्सवाचा मुख्यदिवस
उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवार १० जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन व सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा संपन्न होईल. सकाळी ०९.०० ते ११.३० यावेळेत श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम होईल. तर, दुपारी १२.३० वाजता साईंची माध्यान्ह आरती होईल. सायंकाळी ०७.०० वाजता धुपारती होईल. त्यानंतर सांय ०७.३० ते १०.०० यावेळेत गायिका अनुराधा पौडवाल, साई संध्याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता साईबाबांची सुवर्ण रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असल्याने नित्याची चावडी पुजन होईल.
हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी शेजारती आणि शुक्रवार ११ जुलै रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. त्या दिवशी रात्री १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकार साईबाबां समोर हजेरी लावतील.
(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती )
तिसरा दिवस, समारोप
मुख्यदिवशी साईमंदिर रात्रभर खुले असल्यानं पहाटे काकड आरती न होता मंगलस्नान होवून शिर्डी माझे पंढरपूर आरती तसेच काल्याचं किर्तन आणि मध्यान्ह आरती पुर्वी साई समाधी मंदिरात दही हंडी फोडून उत्सवाची सांगता होईल..
साईसचरित्राच्या १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, ‘नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरुंनी सांगितलेली आचारपध्दती लक्षात ठेवून लोक आपल्या उध्दाराचा मार्ग निवडतात. गुरुंच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उध्दार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो.' साईबाबांना देश-विदेशातील लाखो साईभक्त गुरु मानतात. आणि या उत्सवात हजेरी लावत साई समाधीवर लीन होत आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा देखिल अर्पण करतात.