Ghee Health Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते, हे आपण आजी-आईकडून लहानपणापासून ऐकत आलोय. वरण, भाजी, पोळीसोबत तूप खाल्ल्यास स्वयंपाकाची चव आणि त्यातील पोषणतत्त्वही वाढतात. तर पोळीवर तूप लावून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी वाढते, असा काहींचा समज आहे. विशेषतः मधुमेहग्रस्तांमध्ये तूप खाण्यावरुन गोंधळ निर्माण होतो. डाएटिशियनकडून याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया...
पोळीवर तूप लावून खावे की खाऊ नये?
न्युट्रिकॉप नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये डाएटिशियनने सांगितले की, तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे आहारामध्ये तुपाचा समावेश करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित ठरू शकते. खाद्यपदार्थांमध्ये थोडेसे तूप मिक्स करुन खाल्ल्यास ग्लायसेमिक रिस्पॉन्स कमी होण्यास मदत मिळते आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
तुपामध्ये कोणकोणत्या जीवनसत्त्वांचा समावेश आहे?
शिवाय तुपामध्ये फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन केचा समावेश असतो. या व्हिटॅमिनमुळे हाडे, डोळे, त्वचा, हृदय, मेंदूचे आरोग्य सुधारण्यासह आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
डाएटिशियनने दिलेल्या माहितीनुसार, तुपामध्ये काँज्युगेटेड लिनोलिक अॅसिड (Conjugated Linoleic Acid) असते, ज्यामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांचा समावेश आहे. एकूणच हे अॅसिड शरीरासाठी फायदेशीर असते.
(नक्की वाचा: Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत)
तुपामुळे खरंच वजन वाढते?
तूप खाल्ल्यास शरीराचे वजन वाढते, असाही काही लोकांचा समज आहे. पण डाएटिशियनने सांगितले की, तुपातील हेल्दी फॅट्समुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. यातील पोषणतत्त्वांमुळे अन्नाचे पचन सहजरित्या होते. त्यामुळे पोळीवर एक चमचा तूप लावून खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
केवळ अति प्रमाणात तूप खाणे टाळावे, अन्यथा फायद्यांऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. दिवसभरात एक चमचा तूप खाणे आरोग्यासाठी पुरेसे आहे.
(नक्की वाचा: Ayurevada Tips: चपातीला तूप लावून खाणे योग्य का अयोग्य? आयुर्वेदात दडलंय उत्तर)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )