Health News: रात्री किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? सतत होणाऱ्या लघवीच्या समस्येपासून कशी सुटका मिळावावी?

How To Stop Peeing In Middle Of The Night: रात्री वारंवार लघवी होत असल्यास या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे? याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Health News: रात्री किती वेळा लघवीला होणे सामान्य बाब आहे?"
Canva

How to Stop Peeing In Middle Of The Night: रात्री झोपेत असताना लघवीला होणे ही अनेकदा सामान्य बाब मानली जाते. पण तुमच्यासोबत हे रोजच घडत असेल तर ही परिस्थिती सामान्य नाही. अनेकांना वाटतं की वय वाढल्यामुळे, प्रोस्टेट किंवा कमकुवत मूत्राशयाच्या कारणांमुळे ही समस्या निर्माण होत असावी. पण प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांच्या मते प्रत्येक वेळेस हीच कारणं असतील असे नव्हे. डॉक्टर एरिक बर्ग यांनी इन्स्टाग्राम हँडलवर यासंदर्भात माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये त्यांनी झोपेमध्ये लघवीला होण्यामागील खरी कारणे, लाइफस्टाइल तसेच खाण्यापिण्याच्या सवयीशी संबंधित माहिती दिलीय. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

रात्री किती वेळा लघवी होणे सामान्य आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर बर्ग म्हणाले की, रात्री एकदा लघवीसाठी उठणे हे सामान्य मानले जाऊ शकते. पण ही समस्या जर रोजच असे होत असेल किंवा रात्री दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उठावे लागत असेल तर ते झोप आणि आरोग्य दोन्हीसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पुरेशी झोप होत नाही, सतत थकवा जाणवतो आणि पुढे जाऊन मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.

वारंवार लघवी का लागते?

डॉक्टर एरिक बर्ग यांच्या मते, रात्री वारंवार लघवी लागण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अँटी-डाययुरेटिक हार्मोन (ADH). हे हार्मोन रात्री तयार होणाऱ्या लघवीचे प्रमाण नियंत्रित करते. जर हे हार्मोन योग्यरित्या काम करत नसेल तर रात्री जास्त प्रमाणात लघवी तयार होते. या हार्मोनच्या कार्यात बिघाड होण्यामागे काही सामान्य कारणे असू शकतात, उदाहरणार्थ...

  • शरीरात जास्त मीठ आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असणे
  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे
  • संध्याकाळी जास्त प्रमाणात पाणी पिणे
  • दारू किंवा जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन
  • रात्री गोड किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करणे
  • रात्रीच्या जेवणात खूप जास्त प्रथिनयुक्त पदार्थांचेसेवन करणे

Advertisement

(नक्की वाचा: Pomegranate Benefits: रोज डाळिंब खाल्ल्यास काय होते? त्वचेवर कोणते परिणाम होतील? डाळिंब कोणी खाऊ नये)

पायांमधील सूज हे देखील संकेत असू शकतात

जर तुमच्या पायांमध्ये किंवा घोट्यांमध्ये सूज येत असेल आणि दाब दिल्यावर खड्डा पडत असेल, तर याचा अर्थ शरीरात पाणी जमा झालंय. रात्री झोपल्यावर हे पाणी पुन्हा रक्तामध्ये जाते आणि नंतर मूत्रपिंडांद्वारे लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते.

Advertisement

(नक्की वाचा: Health News: टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे? जास्त वेळ बसल्यास शरीराचे काय नुकसान होऊ शकते?)

या समस्येपासून सुटका कशी मिळवावी?

डॉक्टरांच्या मते, काही सवयी बदलल्यास ही समस्या बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी...

  • झोपण्याच्या किमान 3 तास आधी पाणी पिऊ नये
  • दारू आणि कॅफिनयुक्त पेये विशेषतः संध्याकाळनंतर पिणे टाळा
  • रात्री स्नॅक्स खाणे पूर्णपणे बंद करा
  • गोड, खारट आणि जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा
  • रात्रीचे जेवण पचनास हलके ठेवा, आहारात जास्त प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थांचे समावेश करू नका 
  • दिवसा पोटॅशियमयुक्त पदार्थ खा, जसे केळी, अ‍ॅव्होकाडो, हिरव्या पालेभाज्या समावेश करावा.
  • मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B1 या घटकांच्या कमतरतेमुळेही समस्या वाढू शकते.  

डॉक्टर बर्ग म्हणाले की, अनेक वेळा रात्री वारंवार लघवी लागणे ही केवळ मूत्राशयाची समस्या नसून शरीरात सुरू असलेल्या अंतर्गत बिघाडाचाही संकेत असू शकतो. योग्य आहार, वेळेवर पाणी पिणे आणि चांगली जीवनशैली स्वीकारल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते. मात्र त्रास गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)