उन्हाळ्यात किंवा पार्टीमध्ये सर्रास प्यायले जाणारे कोल्ड्रिंक्स, पॅक केलेले गोड ज्यूस किंवा आरोग्यासाठी घातक असणारी साखरेची पेये जर तुमच्या रोजच्या सवयीचा भाग बनली असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 'वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड'च्या ग्लोबल कॅन्सर अपडेट प्रोग्राम अंतर्गत शास्त्रज्ञांनी जगभरातील 51 कोहोर्ट अभ्यासांच्या 158 अहवालांचे सखोल विश्लेषण केले आहे. या मोठ्या जागतिक पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की, साखरेच्या पेयांचे नियमित सेवन थेट कॅन्सरच्या वाढत्या धोक्याशी जोडलेले असू शकते.
स्वादुपिंड आणि आतड्याच्या कॅन्सरचा धोका 7% ते 9% अधिक
संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जे लोक दररोज सुमारे 355 मिली (अंदाजे एक कॅन) साखरेचे पेय किंवा कोल्ड्रिंक पितात, त्यांच्यामध्ये स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका 9% टक्के आणि मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा धोका 7% टक्क्यांनी अधिक वाढतो. संशोधकांच्या मते या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरसाठी कोल्डड्रिंक्स जबाबदार असल्याचे पुरावे अत्यंत भक्कम आहेत.
(नक्की वाचा- Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')
या पेयांच्या सततच्या सेवनामुळे शरीरात लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि शरीराच्या अंतर्गत भागाला सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवतात, ज्या कॅन्सरच्या वाढीस कारणीभूत ठरतात. तसेच, साखरेच्या अतिसेवनामुळे स्त्रियांमध्ये ओव्हरीयन (अंडकोष) कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो, परंतु यावर अजून मर्यादित पुरावे उपलब्ध आहेत.
डाएट ड्रिंक्सबाबत संशोधकांचे काय आहे मत?
या अभ्यासात कृत्रिम गोडवा वापरून बनवल्या जाणाऱ्या 'डाएट ड्रिंक्स'चे देखील मूल्यमापन करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, डाएट ड्रिंक्स पिण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे संशोधकांना मिळालेले नाहीत. मात्र, काही अत्यंत मर्यादित अभ्यासांमध्ये याचा रक्ताच्या कॅन्सरशी संभाव्य संबंध असण्याचे संकेत मिळाले असून, त्यावर अधिक संशोधन होणे बाकी आहे. नवभारत टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
ज्यूस नको, संपूर्ण फळ खाण्यावर भर द्या!
अहवालात आणखी एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे की, बाजारामध्ये मिळणारे पॅकबंद फळांचे ज्यूस नियमित पिण्याने आरोग्याला कोणताही अतिरिक्त फायदा मिळत नाही. ज्यूस पिण्याऐवजी थेट फळ खाणे शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे. याउलट, संत्र्याचा ज्यूस अतिप्रमाणात पिणे आणि त्वचेचा कॅन्सर यांच्यात संभाव्य संबंध असल्याचे संकेतही या संशोधनातून समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा पेयांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world