Father-in-Law Performs Daughter-in-Law's Kanyadan: नियतीचा एक अत्यंत क्रूर घाला एका हसत्याखेळत्या कुटुंबावर पडला आणि लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच एका तरुणीच्या डोक्यावरील सौभाग्याचे छत्र हरपले. कॅन्सरनं तरुण मुलाला हिरावून घेतले, त्या दुःखाने संपूर्ण कुटुंब कोलमडले होते. मात्र, याच भीषण संकटात सासरचे सासरे आणि सासू हे त्या सुनेसाठी चक्क ढाल बनून उभे राहिले. स्वतःचा तरुण मुलगा गमावल्याचं मोठं दुःख बाजूला सारून, या सासरच्या मंडळींनी आपल्या सुनेचे दुःख आपले मानले आणि तिला नवजीवन देण्याचा एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याने समाज थक्क झाला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ जवळील संत हिरदाराम नगर येथील भौंरी गावात हा काळीज हेलावून टाकणारा पण तितकाच प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. वर्ष 2018 मध्ये कुलूखेडी गावातील प्रियंका हिचे लग्न दिनेश बैरागी यांचा मुलगा कपिल याच्याशी झाले होते. लग्नानंतर प्रियंकाचे शिक्षण सुरू असल्याने ती वर्ष 2023 मध्ये पहिल्यांदा आपल्या सासरी आली. आपल्या मनमिळावू स्वभावाने आणि सेवेने तिने अवघ्या काही दिवसांतच सासरच्या सर्वांची मने जिंकून घेतली आणि ती घराची लाडकी सून बनली.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
दुःखाचा डोंगर आणि सासऱ्यांचे मोठे पाऊल
सगळं काही सुरळीत सुरू असतानाच, प्रियंकाचा पती कपिलला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. कुटुंबाने उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र वर्ष 2024 मध्ये कपिलने जगाचा निरोप घेतला. तरुण मुलाच्या निधनाने बैरागी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, अशाही परिस्थितीत खचून न जाता, शेतकरी असलेले सासरे दिनेश बैरागी यांनी सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मोठा निर्णय घेतला. त्यांनी सुनेला सून न मानता हक्काची मुलगी बनवले आणि तिचे लग्न पुन्हा लावून देण्याचा धाडसी विचार केला. त्यांनी प्रियंकाच्या आई-वडिलांशी चर्चा करून त्यांनाही या निर्णयासाठी तयार केले.

सासऱ्यांनी केले सुनेचे कन्यादान
प्रियंकासाठी योग्य वर शोधल्यानंतर, विदिशा जिल्ह्यातील अरारी खेजडा गावचे रहिवासी गोबिंद बैरागी यांच्याशी तिचे लग्न ठरवण्यात आले. या विवाहाची संपूर्ण तयारी, आर्थिक जबाबदारी आणि सर्व पारंपरिक विधी दिनेश बैरागी यांच्या कुटुंबाने अगदी मुलीच्या लग्नाप्रमाणे पार पाडल्या. लग्नाचा सर्वात भावुक क्षण तेव्हा आला, जेव्हा सासरे दिनेश बैरागी यांनी स्वतः उभे राहून आपली सून प्रियंकाचे कन्यादान केले आणि तिला मुलगी म्हणून साश्रू नयनांनी निरोप दिला. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.
( नक्की वाचा : Palghar : हसता हसता रडू आलं! पालघरमधल्या धबधब्यावर अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र, पर्यटकांचा जीव... पाहा VIDEO )
समाजासमोर आदर्श
या अभूतपूर्व सोहळ्यानंतर अत्यंत भावुक होत दिनेश बैरागी यांनी सांगितले की, प्रियंका आमच्यासाठी कधीच सून नव्हती, ती आमची मुलगी आहे. कठीण परिस्थितीतही जीवन थांबत नाही आणि कुटुंबातील सदस्याला आधार देणे हे आपले कर्तव्य असते. दुसरीकडे, प्रियंकाचे वडील रामबाबू बैरागी देखील सासरच्या मंडळीच्या रूपामुळे भारावून गेले होते. आपल्या मुलीचे सासरचे लोकच तिचे लग्न लावून देऊन समाजसमोर इतका मोठा आदर्श ठेवतील, असा विचारही कधी केला नव्हता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world