Lemon and Clove Remedy: लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टी भारतीय पाककृतींमध्ये वापरल्या जातात. खाद्यपदार्थांची चव वाढवण्याव्यतिरिक्त लवंग आणि लिंबू खाण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळू शकतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करुन लिंबू आणि लवंग एकत्रित खाण्याचे काही जबरदस्त फायदे आणि योग्य पद्धत सांगितली आहे.
लिंबू आणि लवंग खाण्याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले?
डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितले की, लिंबू आणि लवंग (Lemon and Clove Remedy) एकत्रित केल्यास एक शक्तिशाली मिश्रण तयार होते. रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन केल्यास शरीरामध्ये मोठे बदल अनुभवायला मिळतील.
कित्येक आजारांचा धोका होऊ शकतो दूर
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड हे गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शरीराचे कित्येक संसर्गांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल कम्पाउंड आहेत. लिंबू-लवंगाचे मिश्रण खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. विशेषतः पावसाळ्यामध्ये हे मिश्रण खाणे फायदेशीर ठरू शकते.
पचनप्रक्रिया सुधारते
पोट स्वच्छ न होणे, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास लिंबू आणि लवंगाचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन्ही गोष्टींमुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल. पोटातील गॅस कमी होईल.
(नक्की वाचा: Clove Benefits: नियमित लवंग खाण्याचे जबरदस्त फायदे)
सांधेदुखीपासून सुटका मिळेल
डॉक्टर जैदी यांनी सांगितले की, लवंग आणि लिंबूमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. लवंगामध्ये असलेल्या युजेनॉलमध्ये दाहक-विरोधी प्रभाव असतो. तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, यामुळे शरीरावर तसेच शरीराच्या आतील भागातील सूज कमी होण्यास मदत मिळते. या दोन्ही गोष्टींमुळे सांधेदुखी, शरीराला येणारी सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.
फुफ्फुसांसाठी फायदेशीर
डॉक्टर जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवंग आणि लिंबूचा चहा किंवा इन्फ्युझ्ड पाण्यामुळे घशाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. सर्दी-खोकला, शिंका, घशातील खवखव, दमा यासारख्या श्वसनाशी तसेच फुफ्फुसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
(नक्की वाचा: Cloves Benefits: रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास काय होते?)
लिंबू आणि लवंगचे कसे करावे सेवन?
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या पद्धतीने लवंग आणि लिंबूचे सेवन केले जाऊ शकते.
पद्धत 1- लिंबू आणि लवंगाचा चहा
- कपभर पाण्यात दोन ते तीन लवंग मिक्स करुन पाच मिनिटांपर्यंत पाणी उकळू द्यावे.
- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळावा.
- चहा गाळावा आणि रिकाम्या पोटी प्यावा.
पद्धत 2- लिंबू आणि लवंगाचे पाणी
एक लिटर पाण्यामध्ये एका लिंबाचे स्लाइस आणि पाच ते सहा लवंग मिक्स करा.
हे पाणी रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी थोडे-थोडे करुन हे पाणी प्यावे.
(नक्की वाचा: Cloves Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होते?)
ही गोष्ट देखील ठेवा लक्षात
डॉक्टर सलीम जैदी यांच्या माहितीनुसार, प्रेग्नेंट महिला, स्तनपान करणाऱ्या महिला किंवा अॅसिडिटीची समस्या असणाऱ्या लोकांनी हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )