Walking for Burning Fat: धकाधकीच्या जीवनात नोकरी आणि घर-संसारातून वेळ मिळत नाही, त्यात वाढतं वजन याचं मोठं टेन्शन असतं. वजन कमी करण्यासाठी कुणी काय काय करतं. कुणी आपला डाएट कमी करतं, कोणी दिवसातून एकदाच जेवण करतं तर कोणी फक्त ज्यूस पिऊन दिवस काढतात. काही तर तासन् तास जिममध्ये व्यायाम करतात. मात्र इतका व्याप न करतानाही तुमच्या शरीरातील फॅट्स कमी करता येऊ शकतात. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चालणे. अनेक तज्ज्ञ फॅट्स कमी करण्यासाठी चालण्याचा सल्ला देतात.
मात्र याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र योग्य गती आणि नियमित चालण्याचा सराव केला तर काही दिवसात तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. वेट लॉस एक्सपर्ट अंजली सचान यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करीत एक जबरदस्त फॉर्म्युला सांगितला आहे. १ किलो फॅट बर्न करण्यासाठी दररोज किती चालायला हवं आणि चालणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं.
१ किलो फॅटमध्ये किती कॅलरीज असतात?
अंजली सचान यांनी सांगितलं की, १ किलो फॅटमध्ये साधारण ७,७०० कॅलरीज असतात. फॅट लॉससाठी वेळ लागतो, कारण फॅट हा शरीरात एनर्जीच्या स्वरुपात स्टोअर केलेली असते.
चालल्याने किती कॅलरी बर्न होतात?
जेव्हा आपण वॉक करतो तेव्हा प्रत्येक पावलावर शरीर एनर्जी खर्च करतो. शरीरातील स्नायूंची हालचाल होते, हृदयाचे ठोके वाढतात. तज्ज्ञ अंजली यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हजार पाऊल चालल्याने तब्बल ५० ते ७० कॅलरी बर्न होते. ६० कॅलरीचं गणित केलं तर एक किलो फॅट बर्न करण्यासाठी आपल्याला १,२८,००० ते १,५०,००० पाऊलं चालावी लागतील.
१ किलो फॅट बर्न करण्यासाठी दररोज किती चालावं लागेल?
एका दिवसात दररोज १० ते १२ हजार पाऊलं चालत असू तर कमीत कमी १० ते १२ दिवसात १ किलो फॅट बर्न करता येईल. विशेष बाब म्हणजे हे गणित साध्य करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्याही बदलाची किंवा वेगळ्या वर्कआऊटची गरज नाही.
चालणं फायदेशीर का आहे?
अंजली सचान यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालल्याने हळूहळू फॅट कमी होण्यास मदत होते. हेव्ही वर्कआऊटमध्ये भूक वाढते. चालल्यावे हार्मोन्स किंवा पीरियड सायकलवर परिणाम होत नाही आणि जास्त थकवाही येत नाही. याशिवाय चालल्याने मूड चांगला राहतो आणि मानसिक आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.