Yoga Day 2024: बेलीफॅटपासून हवीय सुटका? करा या आसनाचा नियमित सराव

Yoga Day 2024: योग्य पद्धतीने आसनांचा सराव केला तरच यापासून शरीरास पूर्ण लाभ मिळू शकतात. पोट-ओटी पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही देखील बरेच प्रयत्न करत आहात का? तर मग पूर्ण माहिती वाचा...

Advertisement
Read Time: 2 mins
भुजंगासनाचा कसा करावा सरावा?

Yoga Day 2024: पोट आणि ओटीपोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी बहुतांश लोक जीममध्ये जाऊन घाम गाळतात किंवा काही जण शस्त्रक्रियेचाही मार्ग अवलंबतात. पण याऐवजी काही आसनांचा नियमित सराव केला तर तुमच्या संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. बेलीफॅट कमी करण्यासाठी तुम्ही भुजंगासनाचा सराव करू शकता. या आसनामुळे कमरेपासून वरील शरीराला चांगला ताण मिळतो आणि यामुळे शरीराची लवचिकताही वाढण्यास मदत मिळते. या आसनामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आसनाचा सराव केल्यास शारीरिक-मानसिक तणाव कमी होण्यासही मदत मिळेल. महत्त्वाचे म्हणजे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होईल आणि पाठ-पोट आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतील. रक्ताभिसरणाचीही प्रक्रिया सुधारेल.  

(ट्रेंडिंग न्यूज: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

भुजंगासनाचा (Bhujangasana) सराव कशा पद्धतीने करावा आणि सराव करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घ्या सविस्तर...  

भुजंगासनाचा कसा करावा सराव? (How To Do Cobra Pose/Bhujangasana) 

  • सर्वप्रथम योगमॅटवर पोटाच्या बाजूने झोपा.
  • पायांचे तळवे वरील बाजूने असावेत. कपाळ जमिनीवर ठेवावे आणि दोन्ही हात शरीराशेजारी असावेत. ही झाली आसनाचा सराव करण्यापूर्वीची पूर्वस्थिती.
  • यानंतर दोन पायांमध्ये किंचितसे अंतर ठेवा आणि दोन हाताचे पंचे खांद्याच्या थोडेसे खालील बाजूस जमिनीवर ठेवा. 
  • श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत डोके, छाती व पोटाचा भाग हळूहळू वर उचलावा. दोन्ही हातांवर समसमान ताण असावा. ही झाली भुजंगासनाची अंतिम स्थिती.
  • आपल्या क्षमतेनुसार भुजंगासनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे आणि त्यानंतर ज्या क्रमाने भुजंगासनाचा सराव केला, त्याच उलट क्रमाने आसनातून बाहेर यावे. 

आसनाचा सराव करताना या गोष्टींची घ्या काळजी 

  • जेवल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तासांनंतर भुजंगासनाचा सराव करावा. 
  • भुजंगासनाच्या सरावापूर्वी वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. यामुळे हात, खांदे, मान आणि पाठीचे स्नायू सैल होतील. 
  • भुजंगासनाचा सराव करताना दोन पायांमध्ये जास्त अंतर ठेवू नये.  
  • गर्भवतींनी भुजंगासनाचा सराव करणे टाळावे. 
  • मनगट, बरगड्या फ्रॅक्चर झाल्या असतील किंवा पोटाच्या भागामध्ये एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणे टाळावे.  
  • शारीरिक दुखापत टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीअंतर्गतच आसनाचा सराव करावा.  

(ट्रेंडिंग न्यूज: Health Tips: नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.