Is 6 Hours of Sleep Enough: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात झोपेकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. कामाचा दबाव, नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास, कौटुंबिक नातेसंंबंध, नोकरीतील वाढती स्पर्धा या सर्व गोष्टींमध्ये झोपेला मात्र फार कमी महत्त्व दिलं जातं. हे सर्व नसेल तर मोबाइल असतोच. ज्यामुळे रात्री उशीरापर्यंत स्क्रोलिंगमध्ये अधिक वेळ जातो. मात्र अपुऱ्या झोपेचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो, आहारतज्ज्ञ आनंद पंजाबी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी अपुऱ्या झोपेचे धक्कादायक परिणाम सांगितले आहेत.
६ तासांहून कमी झोपत असाल तर...
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती सातत्याने ६ तासांहून कमी झोप घेत असेल तर त्या व्यक्तीचं वजन जलद गतीने वाढतं. त्या व्यक्तीने आपलं डाएट किंवा व्यायामात काहीही बदल केले नसतानाही केवळ अपुऱ्या झोपेमुळे हार्मोनल बदलामुळे वजन वाढतं.
अपुऱ्या झोपेमुळे वजन कसं वाढतं?
- अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. यामुळे भुकेवर नियंत्रण आणणारं हार्मोन्स घ्रेलिन वाढतं. परिणामी भूक वाढते. घ्रेलिन जास्त झाल्यामुळे व्यक्ती वारंवार खात राहते. अतिरिक्त आहार घेतल्यामुळे दुसरीकडे लॅप्टिन नावाचं हार्मोन्स कमी होतं. लॅप्टिन मेंदूला पोट भरल्याचा संकेत देतो. मात्र याच्या कमतरतेमुळे जेवल्यानंतर समाधान होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं.
- याशिवाय कमी झोपेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलची पातळी वाढते. जास्त कोर्टिसोलमुळे पोटाजवळ फॅट जमा होऊ लागलं. ज्यामुळे स्थुलत्व वाढतं. सोबतच अपुऱ्या झोपेमुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हीटीवर परिणाम होतो. ज्यामुळे शरीरातील साखरेचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाही आणि वजन वाढण्याची भीती राहते.
- अपुऱ्या झोपेचा परिणाम मेंदूवर स्पष्टपणे दिसतो. थकवा येऊ लागतो, अशक्तपणा आणि चिडचिड वाढते. अशात मीठ, तळलेलं, जंक फूड खाण्याची क्रेविंग वाढते. जे वजन वाढण्याचं आणखी एक कारण ठरतं.
नक्की वाचा - Insufficient sleep : अपुऱ्या झोपेमुळे हृदयावर मोठा परिणाम; हार्ट फेल होण्याची भीती
- वजन नियंत्रणात आणायचं असेल, स्वत:ला फिट आणि उत्साही ठेवायचं असेल तर झोपेला प्राथमिकता द्यायला हवी. दररोज कमीत कमी सात तासांची चांगली झोप घेण्याची सवय लावा. मोबाइलपासून दूर राहा आणि झोपेची वेळ ठरला. ज्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होईल. चांगली झोप केवळ आरामासाठी नाही तर चांगल्या आरोग्याचा पाया आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)