सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळा म्हटलं की वेगवेगळे साथीचे आजार आलेच. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि टायफॉइड यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढते. या सर्व आजारांचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे. ताप म्हटला की मग त्यावर वेगवेगळे उपाय केले जाता. त्यात घरगुती उपायांचा ही समावेश असतो. परंतु, ताप आल्यावर आंघोळ करावी की नाही आणि कशी करावी, याबाबत अनेक समज-गैरसमज समाजात पाहायला मिळतात. त्याबाबत डॉक्टर काय सल्ला देतात ते आपण पाहणार आहोत.
वैद्यकीयशास्त्रानुसार, ताप हा स्वतः एक आजार नसून शरीरातील संसर्गाशी लढण्याची एक नैसर्गिक यंत्रणा आहे. जेव्हा शरीरात जिवाणू किंवा विषाणू प्रवेश करतात, तेव्हा रोगांशी लढण्यासाठी शरीर आपले तापमान वाढवते. त्यामुळे फक्त औषधे देऊन ताप उतरवणे पुरेसे नसून त्यामागील कारणाचा शोध घेणे आवश्यक असते. अनेकदा ताप आल्यावर शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. काही जण तसे करतात ही.
मात्र, थंड पाण्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी न होता उलट शरीर स्वतःला गरम ठेवण्याचा प्रयत्न करते. यामुळे थरथरी भरू शकते. तसेच जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावर अतिरिक्त ताण येऊन अशक्तपणा वाढू शकतो. जर रुग्णाला जास्त अशक्तपणा नसेल तर त्याने कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होते आणि आराम मिळतो.
रुग्ण आंघोळ करण्याच्या स्थितीत नसेल, तर कोमट पाण्यात कापड भिजवून शरीर पुसून घ्यावे. या काळात द्रवपदार्थ, नारळपाणी आणि ओआरएस (ORS) चे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. ताप 1 ते 2 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्या शिवाय कोणते ही पाऊल उचलू नये. तसे केल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यात जर ताप 2 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला, तर डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करू नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world