Is tea Safe For Small Kids Or Children: हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने हे आजार लवकर होतात. अशा वेळी अनेक घरांतील ज्येष्ठ मंडळी 'चहा' पाजण्याचा सल्ला देतात. चहा प्यायल्याने छातीतील कफ कमी होतो आणि सर्दी-खोकल्यातून आराम मिळतो, असा अनेकांचा समज असतो. मात्र, डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांसाठी चहाचे सेवन करणे अत्यंत हानिकारक ठरू शकते.
लहान मुलांना चहा द्यावा का?
याबाबत पीडियाट्रिशियन (बालरोगतज्ज्ञ) डॉ. रोहित भारद्वाज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करून पालकांना सावध केले आहे. त्यांनी मुलांना चहा देण्यासाठी योग्य वय कोणते आहे, याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे. डॉ. रोहित भारद्वाज यांनी सांगितले की, चहामध्ये 'टॅनिन' (Tannins) नावाचे घटक असतात. या घटकांमुळे शरीरातील आयर्न शोषून घेण्याची क्षमता जवळपास ५० टक्क्यांपर्यंत कमी होते.
मुलांना 'पायका डिसऑर्डर'चा धोका:
लहान मुले तसेही डाळी आणि पालकसारख्या भाज्या कमी खातात. अशात जर त्यांना चहा पाजला गेला, तर त्या पदार्थांमधून मिळणारे आयर्नही शरीरात शोषले जात नाही. आयर्नच्या कमतरतेमुळे मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो. तसेच मुलांना अशक्तपणा चिडचिडेपणा जाणवतो. आयर्नची कमतरता वाढल्यास काहीवेळा मुले माती किंवा भिंती चाटायला सुरुवात करतात, ज्याला वैद्यकीय भाषेत 'पायका डिसऑर्डर' म्हणतात. शरीरासाठी हा अतिशय धोकादायक आजार आहे. याशिवाय, आयर्नची कमतरता असलेल्या मुलांमध्ये श्वास रोखून धरण्याचीसवयही दिसून येते.
Winter Tips: झोपताना कानटोपी, मोजे घालणे चांगले की वाईट? टोपी घातल्याने काय होतं? जाणून घ्या
झोपेवर आणि मेंदूच्या विकासावर परिणाम:
डॉक्टर रोहित यांच्या म्हणण्यानुसार, चहामध्ये कॅफीन असते. कॅफीन हे मेंदूला उत्तेजित करणारे घटक आहे, ज्यामुळे मुलांची झोप डिस्टर्ब होते. मुलांची झोप पूर्ण न झाल्यास त्यांच्या मेंदूचा विकास योग्य प्रकारे होत नाही.
चहा पाजण्यासाठी योग्य वय काय?
डॉ. भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या निर्देशानुसार, लहान मुलांना चहा किंवा कॉफी १२ वर्षांनंतरच द्यायला पाहिजे. १२ वर्षांपूर्वीच्या मुलांसाठी केवळ दूध आणि पाणी हेच सर्वोत्तम पेय आहे. एका-दोन घोट चहा देणे देखील सुरक्षित नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी पालकांना दिला आहे. पालकांनी लहान मुलांना सर्दी-खोकल्यापासून आराम देण्यासाठी चहाऐवजी हळद-दूध किंवा आयुर्वेदिक काढा यांसारखे आरोग्यदायी पर्याय वापरावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world