Jemimah Rodrigues Anxiety Disorder: महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटर जेमिमा रॉड्रिग्सने एंग्झायटी (Anxiety Disorder चिंता विकार) विकाराशी सुरू असलेल्या संघर्षाबाबत तसेच सोशल मीडियावरील टीकेमुळे होणाऱ्या भावनिक तणावाबाबत उघडपणे भाष्य केले. यावरुन मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या घटनेमुळे मानसिक आरोग्यास वैयक्तिक संघर्षाऐवजी सामूहिक लढाई म्हणून पुन्हा मांडण्याची संधी मिळालीय, असे तज्ज्ञांचे म्हणणंय. जेमिमाने महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये शानदार शतक झळकावले, तिच्या या खेळीमुळे टीम इंडिया फायनल मॅचमध्ये पोहोचली.
'विषय केवळ सेलिब्रिटींपुरता मर्यादित नाही'
30 ऑक्टोबर रोजी मॅचनंतर जेमिमाने पत्रकार परिषदेत सांगितले की,"या दौऱ्यामध्ये मी जवळपास दररोज रडतच होते. मानसिकदृष्ट्या मी ठीक नाहीय, एंग्झायटीचा सामना करतेय". जेमिमाच्या या प्रतिक्रियेमुळे मानसिक आरोग्याचा विषय चर्चेत आलाय आणि हा मुद्दा केवळ सेलिब्रिटींपुरता मर्यादित नाहीय. प्रत्येकावर मानसिक तणावाचा परिणाम होतो, तरीही बहुतांश लोक याबाबत उघडपणे बोलत नाहीत", असे तज्ज्ञांचं म्हणणंय.
तज्ज्ञांच्या मते, कित्येक लोकांना लक्षणेही ओळखणंही कठीण ठरते तर काही लोकांना मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेणे शक्य होत नाही, काहीजण कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणींशीही बोलण्यास घाबरतात. शरीरातील अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक असू शकते, असा इशाराही वारंवार डॉक्टरांकडून दिला जातो.
"मानसिक आरोग्याच्या समस्या कोणालाही प्रभावित करू शकतात"
मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करणारी संस्था 'इमोनीड्स' च्या संस्थापक डॉ. नीरजा अग्रवाल यांनी म्हटलंय की, "जेमिमाचे धाडस आपल्याला आठवण करून देते की मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानं ही यश, प्रतिभा किंवा प्रसिद्धी इत्यादी गोष्टी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीलाही प्रभावित करू शकतात".
खेळाडूंवर वारंवार चांगला खेळ खेळण्याचा दबाव, अपयशाची भीती आणि चाहत्यांच्या कधीही न संपणाऱ्या अपेक्षांचा ताण जाणवतो, या सर्व गोष्टी त्या संघर्षांवर प्रकाश टाकतात ज्याचा कित्येक सामान्य लोक कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये किंवा अगदी डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरही सामना करत असतात, असेही अग्रवाल यांनी अधोरेखित केलं.
अग्रवाल असंही म्हणाल्या की, "सोशल मीडिया सक्षम होण्यास मदत करत असला तरी तेथे होणाऱ्या टीका, मिळणाऱ्या धमक्या, तणाव आणि एकटेपणाचाही सामना करावा लागू शकतो. जेमिमाचा प्रामाणिकपणा आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येकाला चढ-उतार दोन्ही अनुभवावे लागते. यावर जेव्हा आपण उघडपणे बोलतो, एकमेकांना पाठिंबा देतो आणि मानसिक आरोग्य तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील ट्रोलिंगला सामान्य बनवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने उपचार सुरू होतात".
"भारतात कोट्यवधी लोक मानसिक आरोग्याचा सामना करतायेत"
'इमोनीड्स'चे सह-संस्थापक तनमय गोयल यांनी म्हटलं की, "भारतात 20 कोटींहून अधिक लोक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करता आहेत, तरीही एक लाख लोकांमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जेव्हा सर्वात जास्त गरज असेल तेव्हा मदत उपलब्ध व्हावी, या दृष्टीने 'इमोनीड्स' संस्था काम करतेय. दुसरीकडे थेरपी सत्रांमध्ये 24 तास मदत देऊ शकतील, डॉक्टरांना सखोल अंतर्दृष्टी प्रदान करू शकतील आणि रुग्णांचा योग्य पद्धतीने देखभाल करू शकतील; असे एआय आधारित टुल आम्ही तयार करत आहोत".
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues: मी रोज रडायचे...जेमिमा रॉड्रिग्स मानसिकरित्या अस्वस्थ होती, Anxiety वर मात कशी करावी? वाचा)
वरवर ठीक दिसणारी माणसंही चिंता-नैराश्याचा सामना करतात?
सीताराम भारतीय रुग्णालयातील सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र जाखड म्हणाले की, "भारतामध्ये मानसिक आजार बहुतेकदा त्या-त्या परिस्थितीशी संबंधित असतात, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती ठराविक समस्यांचा सामना करत असेल, एकटे वाटणे किंवा एखाद्या परिस्थितीचा सामान करण्यास असमर्थ असल्यासारखे वाटणे. मानसिक आरोग्याशी संबंधित संघर्ष नेहमीच नाट्यमय दिसत नाहीत. काही लोक अगदी व्यवस्थित दिसतात, कामामध्ये चांगली कामगिरीही करतात, मित्रमैत्रिणींसोबत हसतात-खेळतात आणि स्वतःच्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत असतात अशीही मंडळी चिंता किंवा नैराश्याने ग्रासलेल्या असतात. अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अडकलेल्या दिसतात. अशा व्यक्ती आतल्याआतच चिंता, स्वतःबाबत शंका वाटणे, थकाव्याचा सामना करत असतात. कधीकधी ते अभ्यास करतात, शतक लगावतात आणि आपल्या टीमला प्रोत्साहनही देतात जसे जेमिमाने केले आणि शांतपणे स्वतःला सांभाळतात".
(Content Source PTI Bhasha)