जाहिरात

दिराची घाणेरडी नजर; पती म्हणाला, सांभाळून घे...;15 वर्षात एकत्र कुटुंबात उद्ध्वस्त होत गेलं मंजुचं आयुष्य

एका महिलेची खरी कहाणी, ती १५ वर्षे एकत्र कुटुंबात काहीही न बोलता, सर्व सहन करीत राहिली. लग्नानंतर आयुष्य कसं बदलतं... जाणून घेऊया.

दिराची घाणेरडी नजर; पती म्हणाला, सांभाळून घे...;15 वर्षात एकत्र कुटुंबात उद्ध्वस्त होत गेलं मंजुचं आयुष्य
AI Image

पती म्हणाला होता, 'जरा सांभाळून घे...' आणि त्याच दिवसापासून पुढील १५ वर्षे मी गप्प राहिले. मी सर्वांसोबत होते, तरीही प्रत्येक दिवस घाबरुन जगत राहिले. 

मला नेहमी वाटायचं, लग्नानंतर मुलीचं घर बदलतं... मात्र माझं केवळ घरच नाही तर आयुष्य बदलून गेलं. लग्नानंतर सर्वात मोठी लढाई बाहेरील जगाशी नाही तर स्वत:च्या घरात लढावी लागेल याचा मी विचारही केला नव्हता. मी एकत्र कुटुंबात राहत होते. लोक, परंपरा, मजा-मस्ती, नात्यांची गर्दी... आणि त्याच गर्दीत माझं एकटेपणा. 

सुरुवातीला सर्व ठीक वाटलं. मी सर्वांशी आपुलकीने वागायचे. त्यांची काळजी घ्यायचे. मी सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होते.  मात्र काही दिवसांनंतर भयंकर सत्य समोर आलं, जे मी शब्दातही सांगू शकत नव्हते. घरातील वातावरण माझ्यासाठी अस्वस्थ करणारं होऊ लागलं. घरातील सदस्यांची बोलण्याची पद्धत बदलली होती. ते तर वारंवार माझ्याकडे टक लागून पाहायचे. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे माझ्यामध्ये भीती निर्माण झाली. 

मोठं कुटुंब होतं...पाहुण्यांचा राबता होता. मजा-मस्ती असायची. सुरुवातील मला वाटलं की, मी एका आनंदी एकत्र कुटुंबाचा भाग आहे. मात्र हळूहळू अशा गोष्टी समोर आल्या ज्याचा उल्लेखही मला करता येत नाही. 

एकेदिवशी माझ्या दिराने माझ्या खांद्यावर हात ठेवला, त्यावेळी मला विचित्र वाटतं.. मात्र चुकून झालं असावं असा विचार करून मी दुर्लक्ष केलं. मात्र यानंतर ते वारंवार तसं करू लागले. अनेकदा तो माझ्या रस्त्यात यायचा, कारणाशिवाय जवळ यायचा. स्पर्श करायचा. प्रत्येकवेळी मी शांत होते. मी स्वत:ची समजूत घालत होते. 

नक्की वाचा - Adhik Maas 2026 : अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? 33 धोंडे वाण देण्याची प्रथा नेमकी काय आहे?

त्या दिवशी मला घर असणं आणि सुरक्षित वाटणं यातला फरक...

मी याबाबत कधीच कुणाशी बोलले नाही. कारण एकत्र कुटुंबात खरं बोलण्याला अनेकदा घर तोडणं मानलं जातं. याशिवाय माझं म्हणणं कोणी ऐकणार नाही अशीही भीती होती.

मी हिम्मत करून एकेदिवशी आपल्या पतीला याबाबत सांगितलं. मला वाटलं आता सर्व ठीक होईल. मात्र त्यांचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. 

'याचा एवढा बाऊ करू नकोस… तुझं कुटुंब आहे, थोडं सांभाळून घे.'

त्या दिवशी मला घर असणं आणि सुरक्षित वाटणं यातला फरक कळला.

त्या दिवशी मला धक्काच बसला. या घरात माझं कोणीच नाही हे मला जाणवलं. त्या दिवशी पहिल्यांदा मला असं वाटलं की, मी केवळ एक सून आहे, माणूस नाही. ज्या घराला मी माझं मानत होते, तिथे माझ्या अस्वस्थतेला जागाच नव्हती. त्यानंतर, प्रत्येक दिवस तोच संघर्ष होता—बाहेरून नाही, तर आतून. सतत भीती, सतत अस्वस्थता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःलाच प्रश्न विचारणं...."मी चुकीचा विचार करतेय का?"

हळूहळू, मी स्वतःला बदललं. मी कमी हसू लागले, एकटी एकटी राहू लागले आणि अधिक सावध झाले. लोक म्हणायचे, "तू पूर्वीसारखी राहिली नाहीस." पण मी का बदलले, हे कोणीच विचारलं नाही.

१५ वर्षे… अशी निघून गेली. रोज स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. प्रत्येक रात्री स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. आता जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला एकच गोष्ट समजते: गप्प राहणे ही माझी चूक होती.

joint family life experience | pain husband does not support | Real Life story

कोणत्याही व्यक्तीला नात्याच्या किंवा 'कुटुंबाच्या' नावाखाली आपला स्वाभिमान गमावण्याची गरज नसते. जर त्या दिवशी मी स्वतःसाठी उभं राहण्याचं धाडस दाखवलं असतं, तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं.

आज मला एक १२ वर्षांची मुलगी आहे. माझ्या दीराचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुली आहेत. तो अजूनही आमच्या घरी येतो. आमचे संबंध इतर कोणत्याही कुटुंबाप्रमाणे अगदी सामान्य आहेत. तो अजूनही माझ्याबद्दल घाणेरडे विनोद करतो, जे मला आवडत नाहीत, पण घरातील सर्वजण त्यावर हसतात. आणि मी अजूनही गप्प राहते.

हो, माझी मुलगी मला अनेकदा म्हणते, "आई, कोणीही तुला काहीही बोलून निघून जाऊ शकतं. तू कोणालाही उत्तर का देत नाहीस?" तिची आई खूप कमकुवत आहे, हे मी तिला कसं समजावून सांगू?  प्रत्येकजण तिच्या आईची टीका करेल, तिला वाईट सून, निरुपयोगी मुलगी आणि आणखी काय काय म्हटले जाईल कोणास ठाऊक.

Latest and Breaking News on NDTV
पण मला आता असं वाटतं की, ज्या वेदना मी गेल्या १५ वर्षांपासून सहन करतेय ते इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये. यासाठी आज ही कहाणी सांगतेय. कदाचित ही बाब मी माझ्या मुलीलाही सांगू शकणार नाही. मात्र माझ्या गप्प राहण्याच्या स्वभावामुळे ती अधिक धाडसी बनली आहे. ती सर्वांशी लढते...संघर्ष करते. माझ्या आयुष्यातील हेच सर्वात मोठं सुख आहे. 

ही कहाणी हरयाणातील मंजूची (नाव बदललं आहे) आहे. मंजूच्या अनुभवातून अनेक गोष्टी अधोरेखित होतात. गप्प राहणे हा उपाय नसतो. तुमच्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करणं हानिकारक ठरू शकतं.  प्रत्येक नात्यात आदर आवश्यक असतो.

टीप - वरील लेख NDTV च्या वाचकाचा अनुभव आहे. यातील विचार तत्सम व्यक्तीचे आहेत. NDTV मराठी याबाबत कोणताही दावा करीत नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com