
Kaju Katli: सण-उत्सव मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. या सणाच्या निमित्तानं दुकानात मिळणाऱ्या 'काजू कतली' (Kaju Katli), लाडू (Laddoo) आणि बर्फीसारख्या (Barfi) मिठाईला चांदीचा वर्ख लावून त्यांची शोभा वाढवली जाते. हा अत्यंत पातळ, चव नसलेला आणि शुद्ध चांदीचा पत्रा असतो, जो मिठाईला आकर्षक आणि समृद्ध रूप देतो. पिढ्यानपिढ्या हा वर्ख मिठाईचा एक सांस्कृतिक भाग राहिला आहे. मात्र, शाकाहारी लोकांसाठी या वर्खाचा वापर एक नैतिक आणि धार्मिक प्रश्न होता. कारण हा वर्ख शाकाहारी आहे की मांसाहारी? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
का आहे संभ्रम?
हा वर्ख शुद्ध चांदीपासून बनवला जातो. चांदीला बारीक करून तिचे अति-पातळ पत्रे बनवले जातात, ज्यांची जाडी 0.2 ते 0.8 मायक्रोमीटर असते. चांदीचे हे अतिशय पातळ पत्रे बनवण्यासाठी पारंपारिकपणे गाईचे आतडे किंवा इतर जनावरांच्या कातडीचा (Ox Gut or Cowhide) वापर केला जात असे. चांदीचा पत्रा सहज वेगळा व्हावा म्हणून कारागीर हा पर्याय निवडत असत.
या कारणामुळे, जनावरांच्या अवयवाच्या संपर्कात आलेला वर्ख शाकाहारी आहे की मांसाहारी, असा मोठा प्रश्न शाकाहारी व्यक्तींना पडतो. त्यामुळेच प्राण्यांच्या मांसाच्या संपर्कात आलेली मिठाई शाकाहारी व्यक्ती खात नाहीत. त्यामुळे, शाकाहारी लोक चांदीच्या वर्ख लावलेल्या मिठाई खाणे टाळतात. त्यांच्या मनात या वर्खबद्दल अविश्वास असतो. तुम्हालाही याबद्दल शंका असेल तर तुमचा संभ्रम आम्ही दूर करणार आहोत.
( नक्की वाचा : दसरा-दिवाळीत 'झेंडू'चाच बोलबाला का? 'या' फुलाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घ्या )
FSSAI चा ऐतिहासिक निर्णय
हा वाद आणि संभ्रम लक्षात घेऊन, ऑगस्ट 2016 मध्ये भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, चांदीच्या वर्खाच्या उत्पादनामध्ये कोणत्याही प्राण्यांपासून मिळालेल्या वस्तूंचा (Animal Tissue or By-products) वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
या नियमाने वर्खाच्या उत्पादन प्रक्रियेतील नैतिक प्रश्न संपुष्टात आणला. यासोबतच, FSSAI ने वर्खाची जाडी, शुद्धता आणि वजनासंदर्भात कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. बाजारात चांदीच्या वर्खाऐवजी ॲल्युमिनियम फॉईलसारखे (Aluminium Foil) असुरक्षित पर्याय विकले जाण्याची शक्यता असल्याने, FSSAI ने या मानकांद्वारे अन्नसुरक्षा (Food Safety) देखील सुनिश्चित केली.
काय आहे सत्य?
आधुनिक तंत्रज्ञान आणि नियमांमुळे चांदीचा वर्ख बनवण्याच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता बहुतांश उत्पादक जनावरांच्या कातडीऐवजी चर्मपत्र (Parchment) किंवा कृत्रिम (Synthetic) आणि पूर्णपणे शाकाहारी पर्याय वापरतात. त्यामुळे चांदीचा वर्ख कोणत्याही प्राण्यांच्या संपर्कात येत नाही.
अनेक प्रसिद्ध कंपन्या त्यांच्या चांदीच्या वर्खासाठी शाकाहारी प्रमाणपत्राची (Vegetarian Certification) हमी देतात. त्यामुळे, आता बाजारात मिळणारी 'काजू कतली' आणि इतर मिठाईवरील चांदीचा वर्ख पूर्णपणे शाकाहारी आहाराच्या नियमांनुसार (Vegetarian Dietary Choices) सुरक्षित आणि योग्य आहे.
मिठाई शाकाहारी असल्याची खात्री कशी कराल?
लेबल तपासा: पॅकेज केलेल्या मिठाईवर 'व्हेज प्रमाणित' (Veg Certified) आहे की नाही, हे तपासा.
दुकानदाराला विचारा: स्थानिक मिठाईच्या दुकानातून खरेदी करत असल्यास, दुकानदाराला वर्खाच्या स्त्रोताविषयी (Source of Vark) स्पष्टपणे विचारा.
वर्ख नसलेला पर्याय निवडा: तरीही संशय वाटत असल्यास, चांदीचा वर्ख नसलेली प्लेन 'काजू कतली' किंवा अन्य मिठाई खरेदी करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world