Madhuras Recipe Success Story: मधुराज् रेसिपी... डिजिटलच्या युगात हे यू-ट्युब चॅनेल कोणाला माहिती नसणार, असे होणे शक्यच नाही. मधुरा बाचल यांचे मधुराज् रेसिपी यू-ट्युब चॅनेल प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक घराघरात हे नाव पोहोचले आहे. या यू-ट्युब चॅनेलवरील किमान एक तरी रेसिपी प्रत्येक गृहिणीने स्वतःच्या घरामध्ये तयार करुन त्याचा आस्वाद नक्कीच घेतला असणार आहे. बालपणी खडतर परिस्थिती अनुभवलेल्या मधुरा यांनी 'Madhuras Recipe' यू-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून यश कसे मिळवले, याची कहाणी त्यांनी खुद्द सांगितलीय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची कहाणी थोडक्यात पाहायला मिळत आहे. मधुरा बाचल यांनी नेमके काय सांगितलंय, हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
"त्याने माझ्या गळ्यावर सुरी ठेवली. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मी निर्णय घेतला. आम्हाला घरातून बाहेर काढण्यात आले आणि आम्ही 100 चौरस फुटावरून 50 चौरस फुटाच्या जागेमध्ये राहायला आलो. मला सायन्स विषयामध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे कॉमर्समध्ये प्रवेश घ्यावा लागला. इयत्ता बारावीच्या परीक्षेनंतर मी हजार रुपये महिन्याच्या पगारावर नोकरी करण्यास सुरुवात केली. सकाळी 7 वाजेपर्यंत ते सकाळी 9 वाजेपर्यंत कॉलेज, यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोकरी आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी रांगोळी-मेंदीच्या ऑर्डर्स घेणे असे माझे वेळापत्रक होते. पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझा पगार पाच हजार रुपये झाला होता.
(नक्की वाचा: रिकाम्या पोटी कच्ची हळद आणि गूळ खाण्याचे फायदे)
पदव्युत्तर शिक्षणानंतर मला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. लग्नानंतर आम्ही अमेरिकेमध्ये शिफ्ट झालो. तिथेही मी नोकरी केली. मुलीच्या जन्मानंतर मला नोकरी सोडावी लागली. फावल्या वेळेत मी यू-ट्युबसाठी व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. 2016मध्ये मी मधुरा रेसिपी मराठी हे यू-ट्युब चॅनेल सुरू केले. या चॅनेलचे दीड वर्षात 10 लाख सबस्क्रायबर्स झाले. जुन्या मधुरा रेसिपी चॅनेलवर 1 लाख सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी मला 6 वर्षे लागली होती. आज मी माझ्या ब्रँडचे मसाले देखील लाँच केले आहेत. तसेच मी पाच पुस्तके लिहिली आहेत, जी सातत्याने Amazonवर विकली जात आहेत".
(नक्की वाचा: Maha Shivratri 2025: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त)
तर अशा पद्धतीने मधुरा बाचल यांनी मधुराज् रेसिपी या यू-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून घवघवीत यश मिळवलं. यू-ट्युब चॅनेलला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते, असेही मधुरा यांनी म्हटलंय.
कॅमेऱ्याच्या मदतीने घरातच टेबल लॅम्पचा वापर करून व्हिडीओ शूट करणे, शूटसाठी घरातीलच वस्तूंचा वापर करणे आणि घरच्या घरी पाककृतीचे व्हिडीओ मधुरा यांनी YouTube पोस्ट केले.
जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरवणे अशक्य नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मधुरा बाचल.