सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Mahashivratri 2025 : आज महाशिवरात्रीनिमित्ताने देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंपैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत. याव्यतिरिक्तही महाराष्ट्रात अनेक पुरातन मंदिर आहेत. सोलापूरातील एक मंदिरात त्यापैकी एक.
सोलापूर जिल्हातील दक्षिण सोलापूर येथे भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे गाव धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर तसेच हरिहरेश्वर मंदिर ही दोन प्राचीन मंदिरे आहेत. याशिवाय बहूमुखी शिवलिंग, मराठीतील आद्य शिलालेख आणि अद्वितीय स्थापत्य, शिल्प आणि मूर्ती कलेचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो.
श्री संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल...
हत्तरसंग कुडल येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असून याला (त्रिकूट) तीन गाभारे आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेक वेळा याचा जीर्णोद्धार झाला आहे. मुख्य गर्भगृहामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेले भव्य शिवलिंग आहे. सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी श्री संगमेश्वर मंदिरातील शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरणे पडतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याचा दावा
श्री संगमेश्वर मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर भारतातील मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोरलेला आहे. या लेखामध्ये, ”जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल” असे म्हटलं आहे. शके 940 म्हणजे इ. स. 1018 साली हा शिलालेख लिहिला गेला असल्याचं सांगितलं जातं.
नक्की वाचा - Mahashivratri 2025 : महादेवाची पूजा करताय? देशातील 12 ज्योतिर्लिंग कोणते? महाराष्ट्रातील आकडा किती, माहिती आहे का?
हरिहरेश्वर मंदिर...
हत्तरसंग कुडल येथे इ. स. 1995 पूर्वी हे मंदिर मातीमध्ये गाडल्याचं आढळून आलं. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातील प्रा. गजानन भिडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उत्खनन करून हरिहरेश्वर मंदिर उजेडात आणले. हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात शैव आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आला आहे. दोन गर्भ गृह, अंतराळ, स्वर्ग मंडप, आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे.
हरिहरेश्वर मंदिरातील दुर्मीळ शिल्प...
येथे एक चेहरा व पाच शरीरे असलेलं दुर्मीळ शिल्प आहे. याशिवाय त्याच्या दोन्ही बाजूला छतावर श्रीकृष्ण आणि गोप तसेच श्रीकृष्ण आणि गोपिका यांचे शिल्प बसवलेले आहेत. मुखमंडपा समोर छोटे भद्र कोरलेले असून त्यामध्ये एकाच दगडावर एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला भैरवी यांचे अखंड शिल्प आहे. मुखमंडपाच्या छतावर श्रीकृष्ण कालियामर्दन करीत असलेले अप्रतिम शिल्प आहे.
बहुमुखी शिवलिंग...
हत्तरसंग कुडल येथील हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात बहुमुखी शिवलिंगाचे अद्वितीय शिल्प सापडले. एका अखंड शिवलिंगावर कोरलेल्या शिवाच्या 359 प्रतिमा आहेत. 359 प्रतिमा असलेले शिवलिंग हे मुख्य शिवलिंग आहे आणि मानवी शरीर पंचमहाभूतांनी मिळून बनलेले आहे आणि 365 दिवस एकत्र आहेत ही त्यामागची संकल्पना आहे. ग्रामस्थांनी विधिवत बहुमुखी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्यावर सुंदर मंदिर बांधले आहे.
पर्यटकांसाठी हत्तरसंग कुडल हे गाव जणू मांदियाळीचे ठिकाणच आहे. शाळेतील तसेच महाविद्यालयातील सहली तसेच अनेक पर्यटक जे आहेत. हत्तरसन कुडल या गावी आपली नेत्र मेजवानी पूर्ण करतात. भारतीय स्थापत्य शैलीचा एक उत्तम उदाहरण म्हणून हत्तरसंग कुडल गावातील मंदिरांकडे पाहिलं जातं.