
ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) फक्त महिलांनाच होतो, हा मोठा गैरसमज आहे. पुरुषांमध्येही (Men) हा कॅन्सर होऊ शकतो, जरी तो दुर्मिळ असला तरी! जागतिक स्तरावर एकूण कॅन्सर प्रकरणांपैकी 1 टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणे पुरुषांमध्ये आढळतात. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकदा पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान खूप उशिरा होते.
दुर्लक्ष का होते?
डॉ. पूवम्मा सी.यू. (अस्टर सीएमआय हॉस्पिटल) यांनी या विषयावर News18 शी बोलताना सांगितलं, भारतातही याविषयी जागरूकता कमी आहे. 60 वर्षांवरील पुरुष ज्यांच्यामध्ये BRCA जनुकीय बदल (Gene mutations), जाडेपणा किंवा कुटुंबात कॅन्सरचा इतिहास आहे, त्यांना धोका अधिक असतो.
ही आहेत ब्रेस्ट कॅन्सरची प्रमुख लक्षणे
- छातीच्या पुढील भागावर गाठ (Lump) जाणवणे.
- गायनोमॅस्टिया (पुरुषांमधील स्तनाची वाढ) अचानक वाढणे किंवा कडक होणे.
- स्तन किंवा स्तनाग्रातून रक्ताचे डाग असलेला स्त्राव येणे (Blood-stained nipple discharge).
- स्तनाग्र आत ओढले जाणे (Retraction of the nipple).
पुरुषांमध्ये स्तनाच्या पेशी कमी असल्याने, गाठ (Tumour) लवकर पसरू शकते. त्यामुळे लवकर तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
( नक्की वाचा : Kaju Katli: तुमच्या काजू कतलीवरचा चांदीचा वर्ख शाकाहारी आहे की मांसाहारी? संभ्रम दूर करण्यासाठी लगेच करा क्लिक )
उपचार आणि बचाव
पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार पद्धती महिलांसारख्याच आहेत, ज्यात मॅस्टेक्टॉमी (स्तन काढून टाकणे), केमोथेरपी आणि हार्मोनल थेरपी (उदा. टॅमॉक्सिफेन) यांचा समावेश आहे.
जाडेपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे मुख्य धोके आहेत. नियमित व्यायाम केल्याने आणि संतुलित आहार घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञ सांगतात. पुरुषांनी आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागरूकता हाच जीव वाचवणारा सर्वात मोठा घटक आहे!
(स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यामधील माहितीचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world