गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान चाळीशी पार गेलं आहे. अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही धोक्यात असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगितलं जात असल्याने प्रत्येकाने सजग राहणं आवश्यक आहे. आधीच उष्णतेचा झळा, घामाच्या धारा त्यात राज्यातील अनेक भागात लोड शेडिंग होत असल्याने नागरिकांना जगणं कठीण झालं आहे. परिणामी अनेकांमध्ये कार्यक्षमता कमी होणं, चिडचिड वाढणं, भीती वाटणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. उष्णतेची लाट, पाणी आणि त्याच्याशी जोडलं गेलेलं मानसिक आरोग्य हा विषय दुर्लक्षित असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. NDTV मराठीने या महत्त्वाच्या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांच्याशी संवाद साधला आणि तापमानवाढीमुळे मानसिक आरोग्य कशाप्रकारे धोक्यात येतंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी उष्माघातामुळे एका 16 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. दुपारच्या वेळात घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. मात्र नोकरीसाठी लोकलमधील गर्दी, धक्के त्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी चिंब झालेले चाकरमानी ऑफिसच्या दिशेने धावताना दिसतात. मात्र याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होत असतो. या दिवसात थकवा लवकर येतो. त्यामुळे ऑफिसातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ऐरवी तेच काम जितक्या एकाग्रतेने केलं जातं, तेच काम उन्हाळ्यात करताना त्रास जाणवतो, असं निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी मांडलं.
ते पुढे म्हणाले, वाढत्या उन्हाच्या तडाख्यात प्रत्येकाच्या दिनचर्येत बदल होत असतो. आपण शंभर टक्के काम करू शकत नाही. परिणामी आपली स्वत:वर चिडचिड होते. त्यातही दुपारनंतर पूर्ण क्षमतेने काम करण्यात अडथळा जाणवतो. अनेक घरांमध्ये कुलर आणि एसीवरुन वाद होताना दिसतात. यावेळी शिसोदे यांनी वसतिगृहातील एका मुलीचं उदाहरण दिलं. उकाडा वाढत असल्याने एका विद्यार्थिनीच्या पालकांनी वसतिगृहातील तिच्या खोलीत एसी लावून दिला. मात्र यानंतर तिच्या आजूबाजूच्या मुली तिच्याच खोलीत वावरू लागल्या, झोपायला येऊ लागला. यामुळे मुलीला स्वत: वेळ मिळेनासा झाला. यातूनच भांडणं वाढल्याचं त्यांनी सांगितलं. उन्हाचा परिणाम आपल्या वागणुकीवरही होत असतो. सौम्यपणे प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यात चिडचिडेपणा दिसतो. त्यामुळे नात्यांमध्ये वाद, भांडणं आणि दुरावा वाढू शकतो.
हे ही वाचा-राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन
पाणी नाही तर लग्नही नाही...
मराठवाड्यातील औरंगाबाद व्यतिरिक्त अनेक छोट्या गावांमध्येही पाण्याअभावी मुलांची लग्न खोळंबली आहेत. केवळ पाण्याच्या मुद्द्यावरुन मुली लग्नाला नकार देतात. पाणी नाही, उत्पन्न नाही परिणामी नोकरी-धंदाही नसल्याने कुटुंबाला नैराश्याचा सामना करावा लागतो. पाणी भरणं हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा कार्यक्रम होऊन बसतो. दिवसातील दोन ते तीन तास पाणी भरण्यासाठी दिला जातो. कुटुंबात काही चांगला विचार होण्याऐवजी पाण्यावरच चर्चा सुरू असते, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
महिलेंचं आयुष्य पाण्याभोवती...
महिलांच्या आयुष्यातील बराचसा काळ हा पाणी आणि त्यासंबंधित विचारात जातो. जर तुम्ही पाणी कपातीचा सामना करीत असाल तर तुमच्या घरातील महिलेमध्ये नैराश्य, चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक वाढते. काही ठिकाणी रात्री-अपरात्री पाणी येतं, त्यावेळी रात्री झोपताना तोच विचार डोक्यात घोळत राहतो. शेवटी पाणी भरण्यासाठी शरीराला आवश्यक असलेली झोपही मिळत नाही. पती-पत्नीमध्येही पाणी भरण्यावरुन वाद होतो. विशेष म्हणजे हा वाद दररोजचा असतो. आपल्या घरातील पाण्याची टाकी भरण्यावरुन शेजारच्यांसोबत होत असलेला वाद आपल्यासाठी काही नवा नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी हा वाद पाण्याचा असला तरी त्याचा आपल्या मानसिक आरोग्याबरोबर नात्यांवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचं डॉ. शिसोदे यांनी सांगितलं.