पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे आणि दूषित अन्न-पाण्याचे सेवन यामुळे लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. विशेषतः 6 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये पोटदुखी, पोटफुगी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या पोटाच्या समस्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. वेळेवर योग्य काळजी घेतल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा: दिवसभरात 3-4 कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास Liverवर काय परिणाम होतील )
पोटाच्या समस्येमुळे रोगप्रतिकार शक्तीवर होतो परिणाम
पावसाळा हा लहान मुलांमध्ये पोटाच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतो, जो एक चिंतेचा विषय ठरत आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते, तसेच वाढत्या आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ जलद गतीने होते. ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अजूनही विकसित होत असते, ती विशेषतः असुरक्षित असतात. रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. सामान्य लक्षणांमध्ये पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, अतिसार, गॅस आणि ताप यांचा समावेश आहे.
( नक्की वाचा: आंघोळ करताना सर्वप्रथम शरीरावरील कोणत्या अवयवावर पाणी घ्यावं? आयुर्वेद काय सांगतं? )
पोटदुखी, उलट्यांनी लहान मुले बेजार
गेल्या 3 ते 4 आठवड्यांत, 10 पैकी 7 बालरुग्ण ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि उलट्या अशा समस्यांसह ओपीडीमध्ये दाखल झाले होते, अशी माहिती औंध येथील महिला आणि बाल रुग्णालयाचे डॉ. सिद्धार्थ मदभूशी यांनी दिली. वेळीच उपचार न केल्यास, या परिस्थितीमुळे डिहायड्रेशन तसेच थकवा येऊ शकतो. वेळेवर योग्य निदान आणि उपचार जसे की ओआरएसचे सेवन करून डिहायड्रेशन टाळणे, अँटीबायोटिक्स (जर आवश्यक असेल तर) आणि हलका व संतुलित आहार महत्त्वाचा आहे. उपचारास विलंब केल्यास लक्षणे आणखी बिघडू शकतात आणि मुलाच्या वाढीवर आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. स्वच्छता आणि आहार नियंत्रणाद्वारे प्रतिबंध हा सर्वोत्तम मार्ग आहे, असेही डॉ. मदभूशी यांनी नमूद केले.
जंकफूड टाळण्याचा सल्ला
डॉ. मदभूशी यांनी म्हटलंय की, पालकांनी खात्री करावी की तुमची मुले गाळून, उकळून थंड केलेल्या पाण्याचे सेवन करतात. उघड्यावरील अन्नपदार्थ, कच्चे सॅलड आणि कापलेली फळे टाळावीत. घरी शिजवलेले ताजे व गरम अन्न, दहीसारख्या प्रोबायोटिक्ससह हलके जेवण द्यावे. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, मुलांना हायड्रेटेड ठेवावे आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळावे. शिवाय वरील लक्षणे 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मोठ्या माणसांनाही होतोय त्रास
मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पीटलचे डॉ. निमित नागदा यांनी म्हटलंय की , पावसाळ्यामुळे 25 ते 50 वयोगटातील प्रौढांमध्ये दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अतिसार, अपचन, जठरास आलेली सूज, पोटदुखी, पोटफुगी, मळमळ आणि उलट्या यासारख्या जठरासंबंधी समस्या सामान्य आहेत, मात्र दैनंदिन जीवनातील काही चांगल्या सवयींनी या टाळता येऊ शकतात.
गेल्या 3 ते 4 आठवड्यात ओपीडीत आलेल्या 10 पैकी 5 प्रौढांनी अतिसार, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या आणि ताप यांसारख्या लक्षणांची तक्रार केली आहे. वरील समस्या टाळण्यासाठी गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या, उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळा आणि घरी शिजवलेल्या व ताज्या अन्नाचे सेवन करा. आजारी पडू नये म्हणून हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या, तसेच वेळीच वैद्यकीय मदत घेतल्यास अशा आजारातून लवकर बरे होता येते असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या )