
Nag Panchami 2025 Date: श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा महिना. श्रावणातील पहिला सण नागपंचमी. नागपंचमी सणानिमित्त महिला उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करुन नागदेवतेची पूजा करतात. नागदेवतेला दुधाचा नैवेद्य अर्पण करतात. नागपंचमी सणाच्या इतिहासाबाबतची माहिती जाणून घेऊया...
नागपंचमी सणाची तिथी (Nag Panchami 2025 Tithi)
नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमी तिथीला साजरा केला जातो.
नागपंचमी सणाचा इतिहास (Nag Panchami 2025 History)
- सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागितला. जन्मेजय राजाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.
- शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. शेषनाग पाताळात राहतो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हणतात. श्रीविष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतात. त्रेतायुगामध्ये श्रीविष्णूने रामाचा तर शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली युगाच्या संधीकाळात भगवान विष्णूने कृष्णाचा तर शेषाने बलरामाचा अवतार घेतला होता, असे म्हणतात. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
- पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळेस नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन. तेव्हापासून प्रत्येक महिला नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करतात.
(नक्की वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमीला नागदेवतेच्या दर्शनाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते? कसा मिळेल आशीर्वाद, जाणून घ्या)
नागपूजनाचे महत्त्व
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।
श्लोकाचा अर्थ: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची पूजा करावी. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही, असे म्हणतात.
नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व
- सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या दुःखात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही.
- म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावांसाठी उपवास करतात.
- भावाला दीर्घायुष्य मिळावे आणि प्रत्येक दुःखसंकटांतून तो बाहेर पडवा, या उद्देशानेही उपवास केला जातो.
(नक्की वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा, महत्त्व जाणून घ्या)
सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले. नागदेवतेने सत्येश्वरीचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे तसेच निरनिराळे अलंकार देखील दिले. सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी महिलावर्ग नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.
नागपंचमीची पूजा केल्यास कोणते लाभ मिळतील?कालसर्प दोष दूर होण्यास मदत मिळेल. जन्मपत्रिकेतील राहु आणि केतुशी संबंधित दोषांपासून मुक्तता मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील आणि जीवनामध्ये सुख-समृद्धी येईल, असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world