
Narali Purnima 2025: दरियावरी आमुची डोले होरी, घेऊन माशांच्या ढोली न आम्ही हाव जातीचे कोली...
समुद्र आणि कोळीबांधवांचे नाते अतिशय खास आहे. याच वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी कोळीबांधव श्रावण महिन्यातील पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात, या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी सणानंतर नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे, नारळी पौर्णिमेची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊया...
नारळी पौर्णिमा 2025 तिथी (Narali Purnima 2025 Date And Time)
श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरू होणार असून पौर्णिमेची समाप्ती शनिवारी 9 ऑगस्ट दुपारी 1.24 वाजता होईल.
नारळी पौर्णिमा शुभ मुहूर्त (Narali Purnima 2025 Shubh Muhurat)
- सकाळी 7.15 वाजेपासून ते 11.00 वाजेपर्यंत असेल.
- दुपारी 12.30 वाजेपासून ते दुपारी 13.30 वाजेपर्यंत असेल.
- रात्री 9 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल.
नारळी पौर्णिमेचे महत्त्व (Narali Purnima 2025 Significance)
नारळी पौर्णिमा मासेमारी करणाऱ्या समुदायांमधील लोकप्रिय सण आहे. हा सण ऋतूशी संबंधित आहे. श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे मासेमारी करणं शक्य होत नाही. पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी समुद्रात विधीवत श्रीफळ अर्पण करण्याची परंपरा आहे. नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात. मान्यतेनुसार मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. या दिवशी लोक पारंपरिक पोशाख परिधान करुन गाणी गाऊन नाचून उत्सव साजरा करतात. समुद्रामध्ये नारळ फेकू नये तर अतिशय हळूवारपणे नारळ अर्पण करावा. समुद्रावर उत्पन्न अवलंबून असलेले लोक या सणानंतर मासेमारी करण्यास सुरुवात करतात.
श्रीफळाचे महत्त्व
नारळ हे शुभ फळ मानले जाते, म्हणून त्यास श्रीफळ म्हणतात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून केली जाते तसेच प्रत्येक पूजेमध्ये देवाला श्रीफळ अर्पण केले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world