Navratri 2024: सातारा जिल्ह्यातील औंधच्या मध्यभागी एका टेकडीवर प्रसिद्ध यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी मंदिरामध्ये त्रिशूळ, बाण, गदा आणि सुपारीच्या पानांनी सजवलेली यमाई देवीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची चित्रे आणि मूर्ती देखील आहेत. श्री यमाई देवीची मंदिरे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, पण औंधमधील देवीचे मंदिर मूळपीठ आहे. यमाई देवीचे देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी आहे.
देवीने केला औधासुराचा वध
भक्तांवर चाललेला औंधासुराचा अन्याय दूर करण्यासाठी स्वतः ज्योतिबा धावून आले होते. पण ज्योतिबांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. तेव्हा ज्योतिबांनी श्री यमाई देवीची मदत घेऊन औंधासुराचा वध केला आणि भाविकांना त्याच्या अन्यायातून मुक्त केले. तेव्हापासून पौष पौर्णिमेचा दिवस आंदोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. भाविक आजही हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात.
(नक्की वाचा: Navratri 2024: हजारो फूट उंच टेकडीवरील मांढरदेवी काळुबाईच्या प्राचीन मंदिराचे हे आहे प्रमुख आकर्षण)
श्री यमाई देवीच्या मंदिराभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्त्याचीही बांधणी करण्यात आली आहे. पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढताना भाविकांना देवीच्या पादुकांचे दर्शन होते. यानंतर ठराविक अंतरावर दोन्ही बाजूस संगमरवरी पाषाणामध्ये हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल यांची शिल्पे पाहायला मिळतील. मंदिरामध्ये पोहोचण्यापूर्वी पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय आहे. हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले आहे. संग्रहालयामध्ये अनेक चित्रकृती, शिल्पे आणि पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
श्री यमाई देवी मंदिराचे वैशिष्ट्य
भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यामध्ये श्री यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात गणपती देवता, दत्तगुरू, भगवान विष्णू, हनुमान आणि देवी सरस्वती यांच्या मूर्तीही आहेत. तटबंदीच्या पूर्वेला एक खिडकी असून दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री यमाई देवीची काळ्या रंगाच्या पाषाणामध्ये घडवलेली आणि कमळावर स्थित असलेली मूर्ती आहे. मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधसुराचेही मंदिर आहे.
(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)
दरम्यान पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. या उत्सवास राज्यभरातून भाविक दाखल होतात.
या मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपामध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्यांच्या कुंचल्यातून चितारलेली पुरातनातील घडामोडींची तैलचित्रे आहेत. मंदिराच्या आवारामध्ये असलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आहे, असे म्हटले जाते. या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कलाकृती आहेत.
मोकळाई मंदिराचा इतिहास
औंध गावामध्ये असलेल्या तळ्या शेजारी असलेले हे मंदिर जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे. जेव्हा यमाई मातेने औंधासुराचा वध केला, तेव्हा युद्धामध्ये जखमांचा दाह देवीला असह्य झाला. तेव्हा मातेने येथील तळ्यात आपले केस मोकळे सोडून जलविहार केला आणि देह शमवला, यामुळे या ठिकाणी देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.