जाहिरात

Navratri 2024: हजारो फूट उंच टेकडीवरील मांढरदेवी काळुबाईच्या प्राचीन मंदिराचे हे आहे प्रमुख आकर्षण 

Navratri 2024: साताऱ्यातील मांढरदेवी काळुबाईच्या मंदिराचे वैशिष्ट्य आणि प्रसिद्ध आख्यायिका माहिती आहे का?

Navratri 2024: हजारो फूट उंच टेकडीवरील मांढरदेवी काळुबाईच्या प्राचीन मंदिराचे हे आहे प्रमुख आकर्षण 

Navratri 2024: शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाईल आणि यानंतर 10 दिवस नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जाईल. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण राज्यातील प्रसिद्ध देवी मंदिरांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. या लेखाद्वारे आपण सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी काळुबाई मंदिराची (Mandhardevi Kalubai Temple) आख्यायिका आणि वैशिष्ट्य जाणून घेऊया...

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथे श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळुबाई या देवीचे मंदिर (Mandhardevi Kalubai Temple Wai) आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5 हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईमध्ये विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे-सातारा जिल्ह्यांसह वाई-भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे. 

वाईच्या उत्तरेकडे मांदार पर्वत आहे, हा पर्वत 'मांढरगड' या नावाने प्रसिद्ध आहे. येथे जायचे असल्यास साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहुन भोरमार्गे जाऊ शकतो. तसेच शिरवळहून लोहोम झगळवाडीतून पाऊलवाटही आहे. येथे म्हसोबाचेही कडक देवस्थान आहे. डाव्या बाजूला मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर देखील आहे, मांढव्य ऋषींची पत्नीला 'मंडी आई' असेही म्हणतात. या मंदिरासमोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे.

Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

मांढरदेवी या नावांनीही आहे प्रसिद्ध

मांढरदेवी (Mandhar Devi Temple) हे काळेश्वरी, डोंगराची वाघीण या नावानेही ओळखली जाते.

मंदिराचे निर्माण कोणी केले?

काळुबाई देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले? (Mandhardevi Kalubai History) याची नोंद कुठेही आढळून येत नाही. हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन असल्याचे समजते. सह्याद्री पर्वतरांगेतील समुद्र सपाटीपासून 4 हजार 650 फूट उंच टेकडीवर हे मंदिर आहे. तर मांढरदेवी काळुबाईचे मंदिर सातार्‍यातून 20 किलोमीटर अंतरावर आहे. 

मांढरदेवी मंदिराचे सौंदर्य

काळुबाईचे मंदिर लहान आहे, पण सभामंडप आणि मंदिराचा गाभारा मोठा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराचा कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या हेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा देखील आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा या देवी सेवक आणि राखणदारांचीही मंदिरे आहेत.  

मांढरच्या काळुबाईची मूर्ती स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. देवीच्या चतुर्भुजी मूर्तीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि तलवार आहे, तर डाव्या हातामध्ये ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. वार्षिक यात्रा उत्सवाच्या दिवशी म्हणजे पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवीला सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवला जातो.  

नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट!

(नक्की वाचा: नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट!)

काळुबाईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला, या पार्श्वभूमीवर पौष पौर्णिमेला देवीआईची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक मांढरगडावर येतात. मांढरदेवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीमध्ये बसवून वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो, हा छबिना हा यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

मंदिराचे मुख्य आकर्षण

काळुबाई मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे काळुबाईची मूर्ती. शिवाय हे मंदिर काळुबाई यात्रेसाठीही प्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान दहा दिवसांचा धार्मिक उत्सव असतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हा यात्रोत्सव असतो. या उत्सवासाठी राज्यभरातून भाविक येथे येतात. 

मांढरदेवीची प्रसिद्ध आख्यायिका

सत युगामध्ये मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी, यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. महादेवाने प्रसन्न होऊन पार्वती मातेची उपासना करण्यास सांगितले. देवी पार्वती त्यांची तपश्चर्या पाहून प्रसन्न झाल्या आणि दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन, असेही सांगितले. यानंतर दैत्याचा वध करण्यासाठी देवी कैलास पर्वताहून मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचा वध दिवसा करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवीने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि दैत्य पुन्हा येऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले. अशा प्रकारे देवीआईने काळुबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला, नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली आणि भाविकांसाठी येथेच स्थानापन्न झाली, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Navratri च्या खरेदीसाठी मुंबईतल्या भुलेश्वर मार्केटमध्ये काय आहे खास.. पाहा स्पेशल व्हिडीओ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com