Parenting Tips: मुलं शाळेतून घरी येतात, तेव्हा प्रत्येक पालक त्यांना काही विशिष्ट प्रश्न विचारतात. 'आजचा गृहपाठ काय आहे?', 'आज काय शिकवले?', 'टेस्टमध्ये किती गुण मिळाले?', किंवा 'डबा खाल्ला की नाही?' हे असे काही प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न आवश्यक असले तरी, केवळ याच प्रश्नांपुरते मर्यादित राहणे मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी पुरेसे नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांच्या विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना असे प्रश्न विचारले पाहिजेत, ज्यामुळे ते मनमोकळेपणाने संवाद साधू शकतील.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सुशील मुंगेकर सांगतात, पालकांनी मुलांशी योग्य संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. हे 5 छोटे प्रश्न केवळ मुलांच्या दैनंदिन अनुभवांबद्दल माहिती देणार नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता देखील मजबूत करतील. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा मुलगा शाळेतून परत येईल, तेव्हा फक्त गृहपाठ किंवा गुणांऐवजी हे प्रश्न नक्की विचारा.
(नक्की वाचा- PM Viksit Bharat Rojgar Yojana: 50 हजार पगार असेल तरी मिळतील 15000 रुपये, तरुणांसाठी सरकारची खास योजना)
पालकांसाठी मुलांना विचारण्यासाठी 5 महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न 1 - आज शाळेत काय मज्जा केली?
हा प्रश्न मुलाला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतो. यातून पालकांना हे कळते की, मुलाचा दिवस कोणत्या गोष्टीमुळे चांगला गेला किंवा त्याने काय खास केले.
प्रश्न 2 - आज वर्गात कोणती कमी जाणवली?
या प्रश्नामुळे पालक हे समजू शकतात की, मुलगा कोणत्या परिस्थितीत किंवा कमतरतेमुळे अस्वस्थ आहे. कदाचित त्याला एखाद्या विषयात मदतीची गरज असेल आणि तुम्ही त्यासाठी आवश्यक मदत देऊ शकाल.
प्रश्न 3 - आज कुणासोबत चांगला वेळ घालवला?
या प्रश्नातून तुम्हाला मुलाच्या मित्र-मैत्रिणींबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. तुम्हाला हे कळेल की, मुलाचे कोणत्या मित्रांशी किंवा शिक्षकांशी चांगले संबंध आहेत आणि त्याचे नातेसंबंध कसे तयार होत आहेत.
(नक्की वाचा- Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस)
प्रश्न 4 - आज काय नवीन केलं किंवा शिकलास का?
हा प्रश्न मुलाला स्वतः विचार करायला लावेल की त्याने दिवसभरात काही नवीन शिकले का? हळूहळू, यामुळे त्याची शिकण्याची आवड वाढेल आणि तो नवीन अनुभवांसाठी उत्सुक होईल.
प्रश्न 5 - उद्याही शाळेत जायला आवडले ना?
हा प्रश्न मुलाच्या मानसिक स्थितीबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती देतो. जर मुलगा म्हणाला की, त्याला उद्या शाळेत जायला मजा येणार नाही, तर हा एक संकेत असू शकतो की त्याला काहीतरी अडचण आहे आणि त्याला मदत हवी आहे.