- डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे
Polycystic Ovary Syndrome Misconceptions: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये आढळणारा सर्वाधिक सामान्य हार्मोनल विकार आहे. याबाबत अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. चुकीची माहिती तसेच जागरूकतेच्या अभावामुळे महिलांना वेळीच निदान आणि उपचारात घेण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे या आजाराची खरी वास्तविकता जाणून घेणे गरजेचे आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
पीसीओएसमध्ये अंडाशयातून सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात पुरुष हार्मोन्स (अँड्रोजेन) तयार होतात. त्यामुळे ओव्हुलेशन अनियमित होते आणि सिस्ट तयार होतात. हार्मोनल असंतुलन, अनुवांशिकता, तणाव, लठ्ठपणा तसेच खराब जीवनशैली ही या समस्येमागील प्रमुख कारणे आहेत. अनियमित मासिक पाळी, मुरुमे, चेहरा तसेच शरीरावर अनावश्यक केस येणे, वजन वाढणे, वंध्यत्वाचा धोका अशी लक्षणे दिसून येतात.
PCOS बाबतच्या असलेल्या या 8 गैरसमजुती | Polycystic Ovary Syndrome Misconceptions
- केवळ जास्त वजनाच्या महिलांनाच पीसीओएसचा त्रास होतो : हे चुकीचे आहे. सडपातळ महिलांनाही हा त्रास होऊ शकतो.
- पीसीओएस म्हणजे वंध्यत्व : हा एक गैरसमज आहे. योग्य उपचार तसेच जीवनशैलीत बदल करून अनेक महिला यशस्वीपणे मातृत्वाचा आनंद घेऊ शकतात.
- अनियमित मासिक पाळी हेच एक लक्षण : वास्तविक पाहता चेहऱ्यावर मुरुम येणे, केस गळणे, मूड स्विंग्ज, त्वचेवरील काळपटपणा अशी अनेक लक्षणे दिसतात.
- ही केवळ प्रजनन समस्या आहे : प्रत्यक्षात पीसीओएसमुळे मधुमेह, हृदयविकार तसेच मानसिक त्रास वाढतो.
- पीसीओएस कायमचा बरा होतो : तो पूर्णपणे बरा न होता अचूक व्यवस्थापनाने नियंत्रणात ठेवता येतो.
- गर्भनिरोधक गोळ्या हाच एकमेव उपाय आहे : जीवनशैलीत बदल, वजन नियंत्रणात ठेवणे, ताण कमी करणे आणि औषधोपचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही : प्रत्यक्षात अनेक पीसीओएसमुळे नैराश्य, चिंता आणि आत्मविश्वास कमी होण्याचा अनुभव येतो.
- हा केवळ प्रौढांचा आजार आहे : किशोरवयीन मुलींमध्येही हा आजार आढळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आहारातील योग्य बदल आणि नियमित व्यायाम हे पीसीओएसची समस्या दूर राखण्यास मदत करते. केवळ पाच ते 10 टक्के वजन कमी केले तरी मासिक पाळी नियमित होते, ओव्हुलेशन सुधारते आणि दीर्घकालीन गुंतागुंत कमी होते.
(नक्की वाचा : Weight Loss Journey: न्युट्रिशनिस्टने डाएटशिवाय 30 Kg वजन घटवलं, फॉलो केल्या 14 सवयी! वाचा वेटलॉसचं सीक्रेट)
महिलांनी स्वतःच्या शरीरातील बदल गांभीर्याने घ्यावे, मासिक पाळीच्या चक्राकडे लक्ष द्यावे आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच निदान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास केवळ प्रजननच समस्याच नाही तर एकूणच आरोग्य सुधारते.
(नक्की वाचा : ना जिम, ना डाएट; खरंच अजगराच्या रक्ताने लठ्ठपणा कमी होणार? शास्त्रज्ञांच्या हाती लागलं वेटलॉसचं मोठं सीक्रेट)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world