Cancer Risk: सावधान! तुम्हीही ऑफिसमध्ये 8 ते 10 तास सलग बसून काम करता? 'या' गंभीर आजाराचा धोका

Health Tips: 'PLOS मेडिसिन' या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनानुसार, सलग जास्त वेळ बसून राहिल्याने कर्करोगाचा आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 10 टक्क्यांनी वाढतो, असे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

कॉर्पोरेट जीवनशैलीत अनेकांचे काम दिवसभर एकाच जागेवर बसून झाले आहे. तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज सकाळी नित्यनियमाने जिममध्ये घाम गाळत असाल, वेगाने चालत असाल किंवा योगासने करत असाल, तरीही तुमचे काम जर 8 ते 10 तास सलग खुर्चीवर बसून राहण्याचे असेल तर हा व्यायाम अपुरा ठरू शकतो. एका नवीन वैद्यकीय संशोधनाने डेस्क जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. सलग दीर्घकाळ बसून राहिल्याने कर्करोग होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, असा धक्कादायक खुलासा या अभ्यासात करण्यात आला आहे.

संशोधनात काय आले समोर? 

प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक 'PLOS मेडिसिन'मध्ये हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी तब्बल 91 हजार पेक्षा जास्त प्रौढ नागरिकांच्या आरोग्याची आणि जीवनशैलीची सलग 12 वर्षांपेक्षा अधिक काळ बारकाईने पाहणी केली.

Advertisement

(नक्की वाचा-  Nashik News: बेल्ट, पाईपने मारहाण, अंगावर चटके; आईकडून लिव्ह इन पार्टनरच्या मदतीने मुलांचा छळ)

या निरीक्षणातून असे दिसून आले की, जे लोक दिवसातून 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सलग एकाच जागेवर बसून राहतात, त्यांच्यात बसण्याच्या प्रत्येक अतिरिक्त तासागणिक कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. विशेष म्हणजे, जे लोक नियमित व्यायाम करतात, परंतु नंतर दिवसभर सलग बसून राहतात, त्यांच्यातही हा धोका कायम असल्याचे संशोधकांना आढळले आहे. याउलट, बसण्याच्या वेळेऐवजी शारीरिक हालचाली वाढवल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: एक सल्ला जीवावर बेतला! अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या)

दीर्घकाळ बसण्याने शरीरावर काय परिणाम होतो?

संशोधकांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती सलग अनेक तास बसून राहते, तेव्हा, स्नायूंची कार्यक्षमता आणि हालचाल कमालीची मंदावते. शरीराची चयापचय प्रक्रिया बिघडते. शरीरात इन्सुलिनचा प्रतिकार वाढतो.  'क्रॉनिक इन्फ्लेमेशन' (शरीरातील अंतर्गत सूज) आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. या सर्व घटकांमुळे कालांतराने कोलोरेक्टल (मोठ्या आतड्याचा कर्करोग), स्तनाचा कर्करोग आणि एंडोमेट्रियल (गर्भाशयाचा कर्करोग) होण्याचा धोका वाढतो. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

हा एक निरीक्षणात्मक अभ्यास असून यात थेट कारण आणि परिणाम यांचा ठोस विज्ञानाचा दावा केलेला नसला, तरी पूर्वीच्या अभ्यासांपेक्षा हे निष्कर्ष अधिक अचूक आहेत. 
 


Topics mentioned in this article