शहरातील मुकुंदवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वाईट संगतीपासून दूर राहण्याचा आणि घरासमोरील ओट्यावर बसून सिगारेट न ओढण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेत रोहिदास दत्तू खकाळ (वय 50 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. हत्या केल्यानंतर या अल्पवयीन मुलाने दाखवलेली गुन्हेगारी प्रवृत्ती पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सल्ला देण्याचा आला राग
मृत रोहिदास खकाळ हे गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्यामुळे घरीच असायचे. मुकुंदवाडी भागात गेल्या काही दिवसांपासून नशापाणी करणाऱ्या आणि टवाळखोरी करणाऱ्या मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोहिदास हे रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर ओट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसत असत. खकाळ यांच्या तिथे बसण्यामुळे या टवाळखोरांना तिथे फिरण्यास आणि नशा करण्यास अडचण येत होती.
रोहिदास खकाळ हे या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या साथीदारांना वाईट संगतीत न जाण्याचा आणि ओट्यावर बसून सिगारेट ओढू नका, असा समजूतदार सल्ला देत असत. मात्र, हा चांगला सल्ला अडथळा ठरत असल्याचा राग या मुलाच्या मनात होता, ज्यातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
घरात घुसून पाठीत आणि पोटात सपासप वार
बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खकाळ दांपत्य जेवण करून घरात विश्रांती घेत होते. त्याच वेळी अचानक त्यांच्या घराचा दरवाजा जोरात ठोठावण्यात आला. रोहिदास यांनी दरवाजा उघडला असता समोर तोच अल्पवयीन मुलगा उभा होता. मुलाने त्यांना उलट धमकी दिली, त्यावेळी रोहिदास यांनी त्याला शांत करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच डोक्यात राग असलेल्या त्या मुलाने थेट ओट्यावर चढून आपल्याकडच्या धारदार चाकूने रोहिदास यांच्या पाठीवर सलग 3 ते 4 वार केले. या भीषण हल्ल्यामुळे रोहिदास रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. तरीही न थांबता मुलाने पुन्हा त्यांच्या पोटात 3 ते 4 वेळा चाकू भोसकला. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेतील रोहिदास खकाळ यांना कुटुंबीयांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
चित्रपटातील 'भाई'सारखी कॉलर उडवत पळ काढला
ज्येष्ठ व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतरही या अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही पश्चात्ताप दिसत नव्हता. उलट, एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील 'भाई'प्रमाणे किंवा व्हिलनप्रमाणे आपली कॉलर उडवत तो ताठ मानेने घटनास्थळावरून निघून जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा हा अवतार पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही प्रचंड भयभीत झाले.
आधीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्ड
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाची पार्श्वभूमी आधीपासूनच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world