जाहिरात

Nashik News: बेल्ट, पाईपने मारहाण, अंगावर चटके; आईकडून लिव्ह इन पार्टनरच्या मदतीने मुलांचा छळ

नाशिकच्या पंचवटी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर लुडो गेम हरल्यानंतर एका निर्दयी आईने तिच्या 'लिव्ह-इन' पार्टनरच्या मदतीने आपल्याच दोन निष्पाप मुलांवर तब्बल वर्षभर अमानुष अत्याचार केले.

Nashik News: बेल्ट, पाईपने मारहाण, अंगावर चटके; आईकडून लिव्ह इन पार्टनरच्या मदतीने मुलांचा छळ

राहुल वाघ, नाशिक

पोटच्या लेकरांवर जन्मदात्या आईनेच क्रूरतेची सर्व सीमा पार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील पंचवटी भागात उघडकीस आली आहे. मोबाईलवर लुडो गेम खेळताना पराभूत झाल्यानंतर येणारा राग ही आई आणि तिचा 'लिव्ह-इन पार्टनर' मिळून दोन निष्पाप चिमुकल्यांवर काढत होते. गेल्या वर्षभरापासून या दोन्ही मुलांचा बेल्ट, प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करणे आणि गरम तव्याचे चटके देणे अशा प्रकारे अमानुष शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. 

शाळेच्या गणवेशात रडत पोहोचलेल्या नातवाने उघड केला छळ

पीडित 13 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलांच्या आजीने (आईची आई) या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी गेल्या तीन वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत आहे. ती आपल्या दोन्ही मुलांसह पंचवटीतील अश्वमेधनगर भागात एका पुरुष मित्रासोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहते. हा अंगावर काटा आणणारा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला, जेव्हा मोठा नातू शाळेच्या गणवेशात रडत-रडत आजीच्या वडापावच्या दुकानात पोहोचला. आजीने त्याला जवळ घेत शांत केले, तेव्हा त्याने वर्षभरापासून सुरू असलेल्या नरकयातनांची माहिती दिली. आई आणि तिचा मित्र आपल्याला आणि लहान भावाला कपडे काढून, उलटे टांगून बेल्ट तसेच प्लास्टिकच्या पाईपने मारत असल्याचे त्याने सांगितले.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: एक सल्ला जीवावर बेतला! अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या)

गरम तव्याचे चटके आणि लुडो गेमचे अजब कनेक्शन

कुटुंबियांनी जेव्हा मोठ्या नातवाचे हात पाहिले तेव्हा त्याच्या दोन्ही कोपराजवळ गंभीरपणे भाजल्याचे व्रण आणि चटक्यांचे ताजे डाग आढळून आले. भीतीने थरथरणाऱ्या मुलाने सांगितले की, दोन-तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी आई आणि तिच्या मित्राने किचनमधील तवा गॅसवर गरम केला आणि त्याच्या दोन्ही हातांवर जबरदस्तीने चटके दिले.

विशेष म्हणजे, दोघेही मोबाईलवर ऑनलाईन लुडो गेम खेळायचे आणि जेव्हा केव्हा ते गेममध्ये हरायचे, तेव्हा त्या पराभवाचा सगळा राग या निष्पाप मुलांवर बेदम मारहाण करून काढला जायचा, असा खळबळजनक उल्लेख आजीने दिलेल्या पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नातवाचा हा छळ पाहून आजी आणि इतर नातेवाईकांनी तात्काळ दोन्ही मुलांना सोबत घेऊन पंचवटी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीडित मुलांची आई आणि तिच्या मित्राविरुद्ध बाल न्याय अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गंभीर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com