जाहिरात

Type 1 Diabetes: टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी शाळा अन् प्रवास सुरक्षित कसा ठेवावा? तज्ज्ञ म्हणाले...

Type 1 Diabetes In Children: लहान मुलांमधील टाइप-1 मधुमेहाची लक्षणे, कारणे आणि व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती. टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांची शाळेत आणि प्रवासात काळजी कशी घ्यावी याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन वाचा.

Type 1 Diabetes: टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी शाळा अन् प्रवास सुरक्षित कसा ठेवावा? तज्ज्ञ म्हणाले...
"Type 1 Diabetes In Children: टाइप 1 मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती"
Canva

डॉ. कोचुराणी अब्राहम, पेडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे

Type 1 Diabetes In Children: टाइप-1 मधुमेह हा प्रामुख्याने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. पण योग्य उपचार, नियमित रक्तातील साखरेचे परीक्षण, संतुलित आहार, शारीरिक हालचाल आणि इन्सुलिनच्या मदतीने या आजाराचे अचूक व्यवस्थापन करता येते. विशेष म्हणजे पालक, शिक्षक आणि कुटुंबीयांचे योग्य सहकार्य मिळाल्यास टाइप-1 मधुमेह असलेली मुले इतर मुलांप्रमाणेच शाळेत जाऊ शकतात, खेळू शकतात, प्रवास करू शकतात आणि दैनंदिन जीवनातील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.

टाइप-1 मधुमेह हा एक ऑटोइम्युन आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील (पॅन्क्रियाज) इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हा आजार जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे होत नाही. तो प्रामुख्याने मुलं आणि तरुणांमध्ये आढळून येतो, त्यासाठी आयुष्यभर इन्सुलिनची आवश्यकता असते.

टाइप 1 मधुमेहाची लक्षणे

या आजाराची लक्षणे ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, सतत भूक लागणे, विनाकारण वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, दृष्टी धूसर होणे आणि वारंवार संसर्ग होणे ही टाइप-1 मधुमेहाची काही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस (डीकेए), डिहायड्रेशन, रक्तातील साखर अचानक कमी होणे तसेच डोळे, मूत्रपिंड, मज्जातंतू आणि हृदयावर दीर्घकालीन परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो.

शाळेत टाइप-1 मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांचे कसे  व्यवस्थापन करावे?

टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांसाठी शाळेतील वातावरण सुरक्षित आणि त्यांना समजून घेणारे असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलाच्या आरोग्याविषयीची माहिती वर्गशिक्षक, शाळेतील वैद्यकीय पथक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांना मुलांमधील रक्तशर्करेची पातळी कमी होणे लक्षणे ओळखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने योग्य उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.

मुलांकडे नेहमी एक आपत्कालीन किट असणे आवश्यक आहे. या किटमध्ये इन्सुलिन, रक्तातील साखर तपासण्याचे उपकरण, ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ग्लुकोन-डी पावडर, पौष्टिक खाऊ, पाण्याची बाटली आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक असावेत. इन्सुलिन घेतल्यानंतर जेवण चुकवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.

(नक्की वाचा: Sleep System: रात्र झाली की लगेच झोप का येते? त्यामागे मेंदूत घडणारं 'हे' मोठं रहस्य जाणून घ्या)

टाइप-1 मधुमेहामुळे मुलांना शाळेतील कोणत्याही उपक्रमापासून दूर ठेवण्याची गरज नाही. खेळ, सहली आणि इतर सर्व शालेय कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. तसेच शाळेत इन्सुलिन घेण्यासाठी सुरक्षित आणि गोपनीय जागेची व्यवस्था असणेही आवश्यक आहे. मुलांना कोणताही त्रास झाल्यास त्यांनी तत्काळ शिक्षक किंवा वैद्यकीय पथकाला माहिती देण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. मित्र-मैत्रिणींकडून होणारी चेष्टा किंवा भेदभाव याविरोधात शाळेने संवेदनशील आणि कठोर भूमिका घेतली पाहिजे.

प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी

टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांसोबत प्रवास करताना योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात इन्सुलिन, सिरिंज किंवा इन्सुलिन पेन, रक्तशर्करा तपासण्याची उपकरणे, त्यासाठी लागणारी बॅटरी, पौष्टिक खाऊ आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवावे.

विमान प्रवास करताना मधुमेहाशी संबंधित औषधे आणि साहित्य चेक-इन सामानाऐवजी हँड बॅगेजमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित ठरते. लांबच्या प्रवासात, विशेषतः वेळेच्या पट्ट्यात बदल होत असल्यास, रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. मुलांनी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि वेळेवर आहार घेणे याकडे विशेष लक्ष द्यावे.

(नक्की वाचा: Makhana Benefits: सलग 30 दिवस तुपात भाजलेले मखाणे खाल्ल्यास शरीरात काय घडले? डॉ. अवतार यांनी दिला 'हा' सल्ला)

रस्त्याने प्रवास करताना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी आणि पौष्टिक खाऊ जवळ ठेवावेत. नवीन ठिकाणी जात असल्यास जवळील रुग्णालये आणि औषधांची दुकाने यांची माहिती आधीच घेऊन ठेवणे उपयुक्त ठरते.

टाइप-1 मधुमेह असलेल्या मुलांना योग्य उपचार, नियोजन आणि कुटुंबीय तसेच शिक्षकांच्या पाठबळामुळे पूर्णपणे सामान्य आणि सक्रिय जीवन जगणे शक्य आहे. थोडी अधिक काळजी, योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने ही मुले शिक्षण, खेळ आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com