वजन वाढणे ही बदलत्या जीवनशैलीत अनेकांना भेडसवणारी प्रमुख समस्या आहे. सतत एका जागी बसून काम करणे ही वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. डेस्क जॉब करणाऱ्या मंडळींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते.
बैठं काम केल्यानं कॅलरी बर्न होत नाहीत. रोज 8 ते 9 तास काम केल्यानंतर थकवा वाढतो. त्यामुळे इच्छा असूनही व्यायाम करणं शक्य होत नाही. तब्येतीकडं दुर्लक्ष होऊ लागतं त्यामधूनच वजन वाढतं.
खुर्चीला चिकटून राहणे
अनेक जण ऑफिसमध्ये कामात इतकी गढलेली असतात की ते कित्येक तास खुर्चीवरुन उठत नाहीत. कोणतीही हलचाल न करता एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्यानं कॅलरी बर्न होत नाही.
ऑफिसमध्ये काम करताना दोन तासांमध्ये पाच ते दहा मिनिटं हलचाल केली पाहिजे. त्यामुळे वजन वाढीची समस्या दूर होईल तसंच शरीरात रक्ताचं अभिसरणही योग्य पद्धतीनं होईल.
सूर्यप्रकाशापासून दूर राहणे
अनेक जण सकाळी लवकर ऑफिसला जातात आणि संध्याकाळी उशीरापर्यंत तिथं काम करतात. बऱ्याचदा ऑफिसमध्ये ते काम करत असताना त्यांचा सूर्यप्रकाशाशी काहीही संबंध नसतो. सूर्यप्रकाश पुरेसा न मिळणे हे देखील वजन वाढण्याचं एक कारण आहे.
पाणी पिण्यास टाळाटाळ
निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, पाणी कमी पिल्यानंही वजन वाढतं हे अनेकांना माहिती नाही. अनेक जण ऑफिसमध्ये काम करताना पाणी पिण्याचं विसरुन जातात किंवा टाळाटाळ करतात.
पाणी कमी पिल्यानं शरीर डिहायड्रेट होतं. एनर्जी लेव्हल कमी होते. आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं. हे खाणं शरीराला योग्य आहे की नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकदा आपण जास्त खातो आणि आपलं वजन वाढतं. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना नियमित अंतरानं पाणी पिणे आवश्यक आहे.
कामाचा ताण
ऑफिसमधील कामाचा ताण वाढल्यानंही वजन वाढते. जास्त ताण घेतल्यानं शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स वाढल्यानंतर जास्त भूक लागते आणि खाणं वाढतं. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कामातील ताण कमी करणे देखील आवश्यक आहे.
वेळेवर न खाणे किंवा गडबडीत खाणेऑफिसमधील कामाच्या तणावात अनेक जण जेवण करणे टाळतात. तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती तातडीनं बदला. वेळेवर न जेवल्यानं देखील तुमचे वजन वाढू शकते.
अनेक जण वेळ वाचवण्यासाठी गडबडीत खातात. भरभर खाल्ल्यानं पचनसंस्थेवर परिणाम होतो. तुम्ही खाल्लेलं नीट पचत नाही. त्याचा परिणामही वजन वाढण्यात होतो.