Ajwain Water Benefits: प्रत्येक घरामध्ये ओव्याची छोटी बरणी नक्कीच असते. काही लोक स्वयंपाकासाठीही ओव्याचा वापर करतात. ओव्याचे आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का? विशेषतः ओव्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतील. प्रसिद्ध योगगुरू डॉ. हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील आणि ओव्याचे पाणी कसे तयार करावे? याबाबतची माहिती जाणून घेऊया...
रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील? (What happens if you drink celery water on an empty stomach?)
पचनप्रक्रिया सुधारते
डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, ओव्यामध्ये थायमोल नावाचे तत्त्व असते. यामुळे पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्युस उत्तेजित होतो, परिणामी जेवणाचे लवकर आणि योग्यरित्या पचन होते.
गॅस-अॅसिडिटीच्या समस्येपासून मिळते सुटका
गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास ओव्याचे पाणी प्यावे. पोटाशी संबंधित समस्येवर हा नैसर्गिक उपाय आहे. पोटाला थंडावा मिळतो आणि गॅस सहजरित्या शरीराबाहेर फेकला जातो.
पावसाळ्यातील गरजेचा उपाय
डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, पर्याय नसल्याने काही लोकांना घराबाहेरचे पदार्थ खावे लागतात. अशा लोकांनी ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. ओव्यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे हानिकारक जंतूंविरोधात लढतात. या जंतुंमुळे जुलाब होणे आणि पोट खराब होण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात डाएटमध्ये ओव्याच्या पाण्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: ओवा आणि काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे फायदे)
मासिक पाळी
महिलांनी डाएटमध्ये ओव्याच्या पाण्याचा समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकते. मासिक पाळीदरम्यान पोट दुखणे, पोटात पेटके येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. ओव्याच्या पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात. यातील अँटी-स्पास्मोडित गुणधर्मामुळे स्नायूंमधील तणाव कमी होण्यास मदत मिळते.
ओव्याचे पाणी कसे तयार करावे?
डॉ. हंसा योगेंद्र यांनी ओव्याचे पाणी तयार करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत.
पद्धत 1:
ग्लासभर पाण्यामध्ये ओवा रात्रभर भिजत ठेवावा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
पद्धत 2:
- सकाळी उठल्यानंतर दोन कप पाण्यात चमचाभर ओवा मिक्स करा आणि पाणी पाच मिनिटे उकळू द्यावे.
- पाणी गाळावे आणि थंड करुन प्यावे.
- आवश्यक असल्यास पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करावे.
(नक्की वाचा: Ajwain Benefits: पोळीच्या पिठामध्ये ओवा मिक्स करण्याचे फायदे)
या गोष्टींचीही काळजी घ्यावी
डॉ. हंसा योगेंद्र यांनी म्हटलं की, दिवसभरात केवळ एक ग्लास ओव्याचे पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास तोंड कोरडे होऊ शकते किंवा पोटामध्ये जळजळ होऊ शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)