आपण एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो, तेव्हा टेबलवर बसल्या बसल्या वेटर सर्वात आधी आपल्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवतो. आपण अजून मेन्यू कार्डही पाहिलेले नसते किंवा खाण्याची कोणतीही ऑर्डर दिलेली नसते, तरीही पाणी सर्वात आधी का येते? हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. बहुतांश लोकांना वाटते की ही केवळ एक सवय किंवा पद्धत आहे, पण यामागे केवळ तहान भागवणे एवढाच उद्देश नसून अनेक व्यावसायिक आणि सांस्कृतिक कारणे दडलेली आहेत.
आदरातिथ्य आणि स्वागत
भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्या पाहुण्याला सर्वप्रथम पाणी देण्याची जुनी परंपरा आहे. हाच नियम रेस्टॉरंट व्यवसायातही लागू केला जातो. टेबलवर पाणी ठेवणे हा ग्राहकांचे स्वागत करण्याचा आणि त्यांना 'तुम्ही येथे हक्काने वेळ घालवू शकता', असा आदरयुक्त संदेश देण्याचा एक मार्ग आहे.
बाहेरील वातावरणातून आलेल्या ग्राहकांना आराम
हॉटेलमध्ये येणारे बहुतांश ग्राहक हे ऑफिस, बाजार, प्रवास किंवा कडक उन्हातून थेट पोहोचलेले असतात. अशा वेळी थकलेल्या शरीराला तात्काळ ऊर्जेची आणि पाण्याची गरज असते. पाण्याचा एक ग्लास ग्राहकाला ताजेतवाने करतो आणि त्याला काही मिनिटे शांत बसून विश्रांती घेण्याची संधी देतो. त्यानंतर ग्राहक शांतपणे विचार करू शकतो.
(नक्की वाचा- Mumbai Rain: मुंबईतून पाऊस गायब! नागरिकांचं टेन्शन वाढलं; पुन्हा कधी बरसणार? हवामान विभागाने दिली माहिती)
ऑर्डर ठरवण्यासाठी मिळतो पुरेसा वेळ
रेस्टॉरंटमध्ये गेल्या गेल्या कोणीही लगेच ऑर्डर देत नाही. आधी मेन्यू कार्डावरील पदार्थ पाहिले जातात, सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रांशी चर्चा केली जाते. वेटरने आधीच पाणी आणून दिल्याने ग्राहकांवर लगेच ऑर्डर देण्याचे कोणतेही मानसिक दडपण राहत नाही. ग्राहक पाणी पिऊन मेन्यू ठरवत असताना, वेटरलाही इतर टेबलवरील कामे किंवा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही मिनिटांचा मोकळा वेळ मिळतो.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: केतनला ढकलल्यानंतर सियाचे पहिले शब्द काय होते? गडावरील सुरक्षारक्षकाने सांगितलं...)
उत्तम सर्व्हिसची ओळख
कोणत्याही मोठ्या किंवा चांगल्या रेस्टॉरंटची ओळख केवळ तिथल्या चवदार जेवणावर तर ठरतेच, याशिवाय तिथे मिळणाऱ्या सेवेवरही ठरते. ग्राहकाच्या गरजेची आधीच दखल घेऊन त्याला पाणी देणे ही एका चांगल्या आदरातिथ्याची सुरुवात मानली जाते.
त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाल आणि ऑर्डर देण्यापूर्वीच तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास येईल, तेव्हा समजून जा की हे केवळ पाणी नाही, तर एका उत्तम व्यवस्थापनाची आणि आदराची ती सुरुवात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world