
World Kidney Day 2025 : मूत्रपिंडाचा आजार ही सध्या वाढती आरोग्य समस्या होत चालल्याचे दिसतंय. हार्मोनल आणि गर्भधारणेशी संबंधित घटकांमुळे महिलांना याचा जास्त धोका असतो. महिलांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचे अनेकदा निदान होत नाहीत. उशीरा निदान झाल्यानं मूत्रपिंडाचे नुकसान होऊन गंभीर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच अनेक महिलांना डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. ही स्थित अधिक बिघडल्यास किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नियमित मूत्रपिंडाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मूत्रपिंडाचे आरोग्य कसे तपासावे?
पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही मूत्रपिंडाच्या समस्या वाढत आहेत. हार्मोनल बदल, ऑटोइम्युन विकार आणि गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत यासारख्या घटकांमुळे महिलांच्या मूत्रपिंडावर परिणाम होतो. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले की, "25-55 वयोगटातील महिलांना दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने (CKD) ग्रासले जाऊ शकते. ज्यामध्ये मूत्रपिंड रक्तातील कचरा गाळण्याचे कार्य थांबवतात. म्हणूनच मूत्रपिंड योग्यरित्या काम करू शकत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारात पाच टक्क्यांनी वाढ झालीय. गर्भधारणेमुळेही मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. ज्यामुळे काही महिलांना मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता असते. शिवाय गर्भधारणा हा एक महत्त्वाचा काळ असतो, जेव्हा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या परिस्थितींमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. मूत्रपिंडाचे आरोग्य तपासण्यासाठी महिलांनी रक्त चाचणी, मूत्रातील प्रथिने, रक्त किंवा असामान्य पदार्थ तपासण्यासाठी (मूत्रविश्लेषण आणि अॅल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो - ACR) यासारख्या चाचण्या कराव्या. महिलांना रक्तदाबाचे नियमित निरीक्षण, अल्ट्रासाउंड, सीटी स्कॅन, एमआरआय आणि मूत्रपिंड बायोप्सीची करण्याचाही सल्ला दिला जातो."
(नक्की वाचा: Cervical Spondylosis Causes : दिवसभर बसून काम करताय? होईल हा गंभीर आजार)
डॉ. शाह पुढे म्हणाले,"मूत्रपिंडाचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात प्रकर्षाने जाणवत नाही. थकवा येणे, सूज येणे, लघवीच्या रंगामध्ये बदल आणि उच्च रक्तदाब ही सामान्य लक्षणे आहेत. नियमित तपासणी, विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांसाठी हा त्रास लवकर ओळखण्यास आणि वेळेवर उपचार करण्यास मदत करेल. संपूर्ण आरोग्य तपासणीनंतर डॉक्टर औषधोपचार सुचवतात. पण गंभीर समस्या टाळण्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे".
मधुमेहग्रस्तांमधील मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. चिंतन गांधी म्हणाले की, मधुमेहामुळे रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि उच्च रक्तदाबामुळे कचरा गाळण्याची क्षमता प्रभावित होऊन मूत्रपिंडाचे नुकसान होते. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करण्याची क्षमता गमावते, तेव्हा दीर्घकालीन मूत्रपिंडाचा रोग (सीकेडी) होतो. पाय सुजणे, थकवा येणे, मळमळणे, वारंवार लघवी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे ही लक्षणे सहसा नंतरच्या टप्प्यात दिसून येतात. उपचार न केल्यास सीकेडीमुळे हृदयरोग, अशक्तपणा आणि मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. एका महिन्यात 35 ते 60 वयोगटातील 10 पैकी नऊ रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असल्याने मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. गेल्या पाच ते सहा महिन्यांत 40 ते 55 वयोगटातील चार ते पाच मधुमेहींमध्ये हात आणि पाय सुजणे, दम लागणे, वजन कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे अशी लक्षणे दिसून आली आहेत जे मूत्रपिंडाच्या आजाराचे संकेत देतात. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त मधुमेही रुग्णांमध्ये अंदाजे दहा टक्क्यांनी वाढ झालीय.
(नक्की वाचा: Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून नक्कीच होऊ शकतो बचाव, दरवर्षी न चुकता करा हे काम)
मूत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात
डॉ. गांधी पुढे म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांनी मूत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचाराद्वारे रक्तातील साखर तसेच रक्तदाबाची पातळी नियंत्रित राखणे आवश्यक आहे. मूत्र आणि रक्त चाचण्यांसारख्या मूत्रपिंडाच्या कार्य चाचण्यांमुळे समस्या लवकर शोधण्यास मदत करतात आणि वेळीच उपचार करण्यास मदत मिळते. गंभीर नुकसान झालेल्या मधुमेही रुग्णांना डायलिसिसवर ठेवले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय आहे. आहारात मीठाचे सेवन कमी करणे, व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपान सोडणे देखील मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका कमी करू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world