International Day of Yoga 2025: योगासनांचा सराव केल्यास शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासही अगणित लाभ मिळतात. योगमुळे शरीरातील आळस दूर होऊन ऊर्जा मिळते आणि मेंदू देखील शांत राहण्यास मदत मिळते. पण आसनांचा सराव रिकाम्या पोटी किंवा काही खाल्ल्यानंतर दोन ते तीन तासांनंतर करण्याचा सल्ला का दिला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? योगासनांचा (International Day of Yoga 2025) सराव करताना पोट रिकामे का असावे, याची माहिती 'योग फॉर लाइफ'च्या को-फाउंडर आणि योग ट्रेनर कविता अरोरा यांच्याकडून जाणून घेऊया...
(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)
जेवणानंतर लगेचच आसनांचा सराव केल्यास काय होते?
कविता अरोरा यांनी सांगितले की, "योगाभ्यास करताना पोटावर ताण येतो आणि जर तुम्ही जेवणानंतर योगासनांचा सराव केला तर पोटावर दबाव येऊन खाल्लेले पदार्थवर अन्ननलिकेतून वर येऊ शकतात. तसेच अन्य शारीरिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ गॅस्ट्रिकची समस्या, अॅसिडिटी, आंबट ढेकर येणे इत्यादी"
कविता अरोरा पुढे असंही म्हणाल्या की, "जेवणानंतर लगेचच योगाभ्यास केल्यास पचनप्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच खाद्यपदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीराची ऊर्जा पचनप्रक्रियेवर खर्च होते. पण जेवणानंतर तुम्ही लगेचच योगाभ्यास केल्यास ती ऊर्जा आसनांवर खर्च होईल, ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जेवणानंतर योगासनांचा सराव करू नये. तसेच पोट भरलेले असताना आसनांचा सराव करताना अडथळेही निर्माण होतात"
(नक्की वाचा: पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 आसनांचा करा सराव)
रिकाम्या पोटी योगासनांचा अभ्यास केल्यास शरीराची सर्व ऊर्जा आसने तसेच प्राणायामावर खर्च होते, परिणामी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीराची रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि सर्व अवयवयांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मुख्यतः आसनांचा सराव करताना लक्ष केंद्रित राहते.
जेवण आणि योगासनांमध्ये किती तासांचे अंतर असावे?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेवणानंतर केवळ एकच आसन केले जाऊ शकते, ते म्हणजे वज्रासन. जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे वज्रासन केल्यास अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. तसेच जेवण आणि योगाभ्यासामध्ये तीन तासांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही दुपारी 2 वाजता जेवण केलंय तर संध्याकाळी 6 वाजेदरम्यान आसनांचा सराव करू शकता. यामुळे पचनप्रक्रियेवर कोणतेही परिणाम होणार नाहीत.
(नक्की वाचा: बेलीफॅट घटवण्यासाठी या आसनांचा करा सराव)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )