
मनिष रक्षमवार, गडचिरोली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सी-60 जवानांचा सत्कार तसेच अत्याधुनिक शस्त्रे व बुलेटप्रुफ जॅकेट वितरण करण्यात आले. दिवसभरातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आज गडचिरोलीमध्ये मुक्कामीही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या गडचिरोली दौऱ्यामध्ये 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, डिव्हीसीएम सपनाक्का (डिकेएसझेडसीएम गीरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह एकूण चार डीव्हीसीएम दर्जाचे वरीष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 01 कोटी 12 लाखाचे बक्षिस जाहिर केले होते.
सपनाक्का चौधरी, रामदास उर्फ चिटकूराम हलामी, शिवलाल उर्फ सुकडू सनकु पदा व पत्नी पुष्पा उर्फ शामबत्ती नागसाय गौरी, कोसा कुंम्मा कोटा,दुर्गी उर्फ रमी चिन्ना वेडकी, अजय उर्फ भीमा सोंगडू मुचाकी, सविता उर्फ सुनिता भीमा नरोटे, अरुणा उर्फ सोनारी येरा तलांकी, दिलीप उर्फ सुधाकर कारु मोहनी अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावे आहेत. त्याचबरोबर संगीता लोहे अत्राम,अंजू उर्फ छाया दसरु वड्डे यांनी स्वयंचलित AK-47 व इतर हत्यारांसह आत्मसमर्पण केले.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
यावेळी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली. “माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमावर ठेवून त्या पद्धतीने गडचिरोलीत विकासकामे करावी, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world