
Medical News : परभणीतील एका महिलेला वारंवार पोट दुखणं, पोटाचा घेर वाढण्याचा त्रास होत होता. अचानक तिचं वजनही वाढलं होतं. त्यामुळे महिला चिंतेत होती. शेवटी 32 वर्षीय महिलेने अकोल्यातील रुग्णालय गाठलं. येथे डॉक्टरांनी तिला जे काही सांगितलं यानंतर तिला धक्काच बसला. महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि या महिलेच्या गर्भाशयातून तब्बल साडे 16 किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आला. तब्बल दोन तास महिलेवर शस्त्रक्रिया सुरू होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोल्यातल्या लक्ष्मीनारायण मेमोरीयल रुग्णालयातून हा प्रकार समोर आला. वारंवार पोट दुखणं, पोटाचा घेर वाढणे यामुळे त्रस्त झालेल्या महिलेच्या गर्भाशयातून हा 16 किलोहून जास्त वजनाचा मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. अकोल्यातल्या लक्ष्मीनारायण मेमोरीयल रुग्णालयात महिलेवर ही शस्त्रक्रिया पार पडली. प्रसूती व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
नक्की वाचा - Pune Crime News: खाऊचं आमिष दाखवलं, शाळेत निघालेल्या चिमुकली बरोबर भयंकर घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील एका 32 वर्षीय महिलेच्या गर्भशयात 16 किलो वजनाची गाठ तयार झाली. या गाठीमुळे महिला त्रस्त झाली होती. मागील दोन वर्षातच महिलेच्या गर्भशयात 16 किलो वजनाची गाठ तयार झाली. यामागील कारण अद्याप पर्यंत समजू शकलेलं नाही. डॉ. मुकेश राठी यांनी या रुग्ण महिलेच्या तपासण्या करून शस्त्रक्रियेची जटीलता जाणून घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत महिलेच्या गर्भाशयातून 16.75 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाला वाचवण्यात यश आलं आहे. यामुळे ती आई बनू शकणार आहे. आता या महिला रुग्णाचे चालणे, फिरणे, खाणे-पिणे सुरू झालं आहे.
अशा शस्त्रक्रिया व एवढे मोठे ट्यूमर क्वचितच आढळतात. या ट्युमरचा आकार व वजन याची नोंदणी रेकॉर्ड बुकमध्ये करणार असल्याचे डॉ. राठी सांगतायत. तसेच मांसाचे काही नमुने वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवले असल्याचे ते म्हणाले. 32 वर्षीय महिलेला अद्याप मूलबाळ नाही. ही महिला रुग्ण मागच्या दोन वर्षांपासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होती. या संदर्भात तिने उपचार घेतले. मात्र दुखणे बरं होतं नव्हतं. अखेर तिच्या पोटातील भलीमोठी गाठ बाहेर काढण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world