Beed-Ahilyanagar railway service inaugurated : बीड जिल्ह्याच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या वृत्तांमुळे बीड जिल्ह्या चर्चेत होता. मात्र बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बीडकरांसाठी लवकर सुरू होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांसाठी अनोखी भेट दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी 'बीड-अहिल्यानगर' या टप्प्यातील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते परळी वैद्यनाथ हा रेल्वेमार्गाने जोडला जाणार आहे. अहिल्यानगर ते परळी वैद्यनाथ हा तब्बल 227 किमी मार्ग रेल्वेने जोडला गेल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर ते बीड - 128 किमी
बीड ते परळी वैद्यनाथ - 93 किमी
अहिल्यानगर-बीड-परळी वैद्यनाथ रेल्वे मार्गासाठी नव्याने 150 कोटींचा निधी
बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ' या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात नव्याने 150 कोटींची भर घालून हा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर' या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.