अहिल्यानगर: महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि जयंत पाटील यांचे फारसं चांगलं नाही, अशी कायम चर्चा असते मात्र अजित पवारांनी आता नवीनच राजकीय खेळी खेळली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरी स्नेहभोजनासह बंद दाराआड चर्चा केली. यामुळे प्राजक्त तनपुरे यांचे मामा जयंत पाटील यांची धडधड वाढली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिवसाच्या अहिल्याबाई नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वेगवेगळ्या विकास कामांच्या निमित्ताने अजित पवार राहुरी विधानसभेत सुद्धा होते. सध्या या विधानसभेत मतदारसंघात भाजपाचे शिवाजीराव कर्डिले 2024 विधानसभेत जिंकून आले आहेत. कर्डिले यांनी जयंत पाटील यांचे भाचे असणारे प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला आहे. प्राजक्त तनपुरे सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम देखील केले.
Political News: राज-उद्धव यांच्यात 20 मिनिटे काय चर्चा झाली? 'सामना'तून सविस्तर माहिती आली समोर
गेल्या काही कालावधीत वारंवार जयंत पाटील हे महायुतीत सहभागी होतील याची जोरदार चर्चा आहे, मात्र जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाला अजित पवारांकडूनच कुठेतरी खेळ घातल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोरदार आहे. अशातच अजित पवारांनी तनपुरे यांच्या घरी आवर्जून भेट दिली. तनपुरेंचे वडील हे माजी खासदार असून शरद पवारांबरोबर देखील त्यांनी काम केले आहे. अजित पवारांच्या या कौटुंबिक भेटीत मागे भविष्यातील वेगळी राजकीय पेरणी असल्याचे सुद्धा जोरदार म्हटलं जात आहे.
शरद पवार यांच्या पक्षातले अनेक नेते आता अजित पवार स्वतःच्या पार्टीमध्ये घेत आहेत. आगामी काळात भाजप आणि शिवसेनेला कडवं आव्हान तयार करण्याच्या हालचाली अजित पवार करत आहेत. अशातच तनपुरे घरी स्नेहभोजनाची भेट आणि अर्धा तास राजकीय विषयावर चर्चा झाली. यामुळे तनपुरे यांना भविष्यात अजित पवार स्वतःच्या पार्टीत घेणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. एका बाजूला मामा जयंत पाटील यांच्याविषयी पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच भाच्यालाच अधिक गळ घालण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होणार अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील