सुनील दवंगे, अहमदनगर
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये निघालेल्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी जमली होती. यावरून अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका देशद्रोहाचे गुन्हे असलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला एवढा मोठा जनसमुदाय जातोच कसा, असा सवाल करत त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे.
पुण्यातील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार याची 31 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्येनंतर 1 जानेवारी रोजी श्रीरामपूर येथे पार पडलेल्या त्याच्या अंत्यविधीला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या प्रकारावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
31 डिसेंबर रोजी दुपारी श्रीरामपूरमध्ये दोन दुचाकीस्वारांनी बंटी जहागीरदारवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बंटी जहागीरदार हा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपी होता. त्याच्यावर अनेक देशद्रोहाचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. 1 जानेवारी रोजी झालेल्या अंत्यविधीला हजारोंच्या संख्येने लोक आणि काही राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विखे पाटलांचा थेट हल्लाबोल
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, "एखाद्याची दिवसाढवळ्या हत्या होणे ही कायद्याच्या दृष्टीने चुकीची बाब आहेच, पण ज्या व्यक्तीवर देशद्रोहाचे गुन्हे आहेत, जो बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे, त्याच्या अंत्यविधीला राजकीय नेत्यांसह एवढा मोठा जनसमुदाय जातोच कसा? हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे."
(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)
पोलिसांची कारवाई
बंटी जहागीरदारच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि नाकेबंदीच्या जोरावर दोन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण काय आणि यामागे मोठी टोळी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, अंत्यविधीच्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विखे पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.