प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद सुरू झाला आहे. संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून संत शेख महंमद महाराजांची ओळख आहे. मुस्लीम कुटुंबातील जन्म असतानाही संत शेख महंमद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. त्यांची श्रीगोंदा शहरात संजीवन समाधी आहे. त्यामुळे संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे असे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटते. तर शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणारे अमीन शेख यांनी मात्र मंदिर परिसरात "सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह" नावाने ट्रस्ट सुरू केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळे मंदिराला दर्गाह म्हणून संबोधल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. याला विरोध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील नागरिक एकवटले असून आज या संदर्भात श्रीगोंदा शहरातून बसस्थानक येथून मोर्चा सुरू होऊन श्रीगोंदा शहरातून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सोबतच जोपर्यंत मंदिर जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत श्रीगोंदा बेमुदत बंद देखील केलं जाणार आहे.
नक्की वाचा - Buldhana News : केसगळतीनंतर बुलढाण्यात नवं संकट; नखं गळून पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
1953 संत शेख महंमद महाराजांचे मंदिर नोंदणी केली आहे. परंतु काही वर्षांपूर्वी संत शेख महंमद महाराजांचे वंशज यांनी "सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह" नावाने शेख आमिन हूसेन या व्यक्तीने ट्रस्ट सुरू केले आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले जाते. या सप्ताहास तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून भाविक येत असतात.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील जनतेची सुरुवात शेख संत महंमद बाबांच्या दर्शनाने होते. शुभकार्याची सुरुवात देखील संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन करूनच होते असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.