शरद सातपुते, सांगली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटळ्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार सांगलीतील तासगाव येथे बोलत होते. अजित पवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार यांनी म्हटलं की, आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली, त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर आर पाटलांनी सही कशी केली, याचा उलगडा केला. आर आर पाटलांना आपण प्रत्येक वेळी आधार दिला, पण आबांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी फोन, अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पुण्यातील भाजपा उमेदवाराची माघार )
2014 साली सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनी तुमची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं दाखवलं. त्यावेळी मला धक्का बसला, असंही अजित पवार म्हणाले.
(नक्की वाचा- राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य)
आर आर पाटलांना प्रत्येकवेळी आधार दिला
मुंबईत बॉम्बस्फोटानंतर 'बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती है', या वाक्यामुळे आबांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तीन महिन्यातच आबांनी सांगितलं की आता माझ्याकडे कोणीच येत नाही. त्यावेळी मी विनायक मेटे यांना हेलिकॉप्टर घेऊन अजलीला पाठवलं. आबांना घेऊन यायला सांगितलं आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. मी प्रत्येक वेळी आर आर पाटलांना आधार दिला. तंबाखू खाऊ नका म्हणून मी जाहीर सभेत आबांवर टीका केली होती, आपले म्हणूनच मी त्यांना बोललो होतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं.