रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदासंघातील अंतर्गत मतभेद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्याक्षणी यश आलं आहे. वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यानंतरही भाजपाने नेते जगदीश मुळीक इथून निवडणूक लढवण्यास ठाम होते. मुळीक यांना भाजपाचा AB फॉर्म मिळाला होता. त्यानंतर ते मंगळवारी अर्ज भरण्यासाठी निघाले देखील होते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी फोन करत त्यांची समजूत काढली आहे.
मी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यासाठी आलो होतो पक्षाकडून मला एबी फॉर्म देखील देण्यात आला होता.. मात्र प्रक्रिया सुरू असताना माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे फॉर्म भरु नका. मी आता कुठलाही फॉर्म भरणार नाही मला माझ्या नेत्यांनी आश्वासित केला आहे मला न्याय दिला जाईल, असं मुळीक यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जगदीश मुळीक 2014 ते 19 या कालावधीमध्ये या मतदारसंघाचे आमदार होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुनील टिंगरे यांनी पराभव केला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातामध्ये टिंगरे यांची भूमिका चांगलीच वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाणार अशीही चर्चा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करत या चर्चेला पूर्णविराम दिला.
सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मुळीक निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. या मतदारसंघात भाजपाचा पाया भक्कम असल्यानं आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची आग्रही मागणी होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मुळीक इच्छूक होते. पण, भाजपानं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानं मुळीक नाराज झाल्याची चर्चा होती. भाजपा श्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानसभेसाठी शब्द दिला होता, असं सांगितलं जातं.
( नक्की वाचा : पुण्यात भाजपामधील नाराजी उघड! उमेदवारी न मिळाल्यानं शहराध्यक्ष बंडखोरी करणार? )
जगदीश मुळीक यांनी अर्ज शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यानं आता वडगाव वशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बापू पठारे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world