Ajit Pawar Death : सुप्रिया आणि सुनेत्रा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडल्या; कोण आहे ही व्यक्ती? 

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना कठीण प्रसंगी सांत्वन देणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे...

जाहिरात
Read Time: 2 mins

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. या वृत्ताने अख्खा महाराष्ट्र कोसळला. पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. अजित पवारांच्या निधनाचं वृत्त समजताच पवार कुटुंबासह त्यांचे कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. 

सुप्रिया सुळे जेव्हा बारामतीत आल्या तेव्हा त्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागल्या. त्यावेळी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. त्या व्यक्तीला पाहून सुनेत्रा पवार स्वत:चे अश्रू रोखू शकल्या नाहीत. आणि त्यांनीही अश्रूचा बांध मोकळा केला. त्यानंतर या ज्येष्ठ व्यक्तीची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना कठीण प्रसंगी सांत्वन देणाऱ्या या व्यक्तीचं नाव विठ्ठल मणियार. 

विठ्ठल शेठ मणियार कोण आहेत? 

विठ्ठल सेठ मणियार हे शरद पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. ते एक व्यावसायिक आहेत. ते शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि जुने कौटुंबिक मित्र आहेत. त्यांनी शरद पवारांना त्यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून साथ दिली. शरद पवार आणि मणियार यांची मैत्री अनेक दशकं जुनी आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने मणियार यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होत्या, यावरुन ते कुटुंबाच्या किती जवळचे आहेत, हे लक्षात येतं. पवारांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाबद्दल त्यांना माहिती आहे. विठ्ठल शेठ यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवारांसोबतच्या मैत्रीबाबत अनेक राज खुले केले होते. त्यांनी  सांगितलं की, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी शरद पवारांविरुद्ध विद्यार्थी प्रतिनिधीपदाची निवडणूक लढवली होती. ते म्हणाले, "मी हरलो, पण त्या पराभवाने मला एक चांगला मित्र दिला. मित्र बनवणे सोपे आहे, पण ते टिकवणे कठीण आहे."

नक्की वाचा - Ajit Pawar : ' ताई, आमचा पंढरीचा पांडुरंग आज चितेत...', बारामतीकराची सुप्रिया सुळेंना भावनिक साद

विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टीदेखील आहेत मणियार...

विठ्ठल सेठ मणियार हे बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टीदेखील आहेत. याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. याच्या इतर ट्रस्टीमध्ये युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांचाही समावेश आहे. उपाध्यक्ष अशोक वासुदेव आहेत. या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आला होता. विठ्ठल मणियार आणि शरद पवार यांची मैत्री पुण्यातील बीएमसीसी कॉलेजपासून सुरू झाली होती. मणियार  हे पवार कुटुंबातील एक मानले जातात. सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या पॉवर कॉरिडोरमध्ये असूनही मणियार यांनी कधीही कोणतीही राजकीय निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही सरकारी पद मिळवले नाही. त्यांनी नेहमीच मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पसंत केली. कठीण काळात ते कायम पवार कुटुंबासोबत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मागणीत त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. 

Advertisement