Ajit Pawar Death : १५,००० तास उड्डाण करणारे धाडसी पायलट सुमीत कपूर यांच्यावर महाराष्ट्राचे मोठे नेते अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. पांढरा गणवेश, खांद्यावर चार सोनेरी पट्टे आणि आत्मविश्वासू चेहरा. परंतु या तेजस्वी कारकिर्दीमागे धक्कादायक चेहरा समोर आला आहे.
कॅप्टन सुमीत कपूर यांच्याकडे १५ हजारांहून अधिक तास उड्डाण करण्याचा अनुभव होता. याचा अर्थ आयुष्यातील मोठा भाग त्यांनी आकाशात उड्डाण करताना घालवला होता. मात्र त्यांच्याबाबत अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन सुमीत यांनी भूतकाळात ड्यूटीवर दारू पिऊन जाणे आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात आहे. दारू प्रकरणात कॅप्टन सुमीत यांना यापूर्वी तीन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं.
दोन वेळा दारु पिऊन ड्यूटीवर दाखल...
एव्हिएशन नियमांनुसार, उड्डाण करण्यापूर्वी एक थेंब दारू पिणं देखील धोकादायक ठरू शकतं. मात्र कॅप्टन सुमीत कपूर यांच्या रेकॉर्डमध्ये अशा दोन घटनांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये ते दारु पिऊन ड्यूटीवर आले होते.
१. १३ मार्च २०१० - दिल्ली एअरपोर्टवर उड्डाण S2-231 (दिल्ली-बंगळुरू) च्या उड्डाणापूर्वीच झालेल्या Breath Analyzer (BA) टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळले होते.
२. ७ एप्रिल २०१७ - सात वर्षांनंतर त्यांनी तिच चूक पुन्हा केली होती. दिल्लीहून गुवाहाटीला जाणारं विमान S2-4721 दरम्यान दुसऱ्यांदा ते ड्यूटीदरम्यान दारुच्या नशेत पकडले गेले होते.
तीन वर्षांसाठी निलंबित...
दुसऱ्यांदा पकडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कडक भूमिका घेतली. २४ एप्रिल २०१७ रोजी अधिकृत आदेश जारी करीत त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. कोणत्याही व्यावसायिक पायलटसाठी तीन वर्षांचं निलंबन कारकिर्दीच्या समाप्तीसारखं असतं. मात्र तरीही सुमीत पुन्हा विमान चालवू लागले आणि 'व्हीएसआर व्हेंचर्स' सारख्या ऑपरेटर्समध्ये सामील होऊन व्हीआयपी फ्लाइट्स उडवण्यास सुरुवात केली.
पायलट आणि VSR वेंचर्स संशयाच्या घेऱ्यात
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा अशा पायलटकडे सोपवण्यात कशी आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खाजगी ऑपरेटरबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या पायलटच्या कामाबाबत आधीच संशय होता, त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी देण्यात आली? कंपनीने कॅप्टन सुमीतची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली नव्हती का? बारामतीमध्ये विमानाने पहिल्यांदा लँडिग मिस केलं आणि त्यानंतर गो अराऊंड दरम्यान विमान क्रॅश झालं. यामुळे ही घटना मानवी चूक असल्याचं दिसून येत आहे.
शेवटच्या ३६ मिनिटात काय घडलं?
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी सभेत सामील होण्यासाठी आज अजित पवार सकाळी मुंबईहून निघाले होते. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या विमानाने उड्डाण केलं. एटीसीनुसार, ८ वाजून १८ मिनिटांनी विमानाने संपर्क केला त्यावेळी पायलटला रनवे दिसत नव्हता. त्यामुळे लँडिंगचा पहिला प्रयत्न फोल झाला. पायलटने दुसऱ्यांदा प्रयत्न केला. ८ वाजून ४३ मिनिटांनी पायलटला रनवे दिसला. एटीसीने लँडिंगची परवानगी दिली आणि अवघ्या सहा सेकंदात विमान क्रॅश झालं. यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. सिव्हील एव्हिएशन मंत्र्यांच्या म्हणण्यांनुसार, दृश्यमानता कमी असल्या कारणाने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तपासाअंती नेमका प्रकार समोर येईल.